गडचिरोली - गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवरील प्राणहिता नदीवर सुरू असलेल्या पुष्कर मेळ्यात स्वित्झर्लंड येथील एका युवकाने हजेरी लावत भारतीय धार्मिक परंपरेचा जवळून अनुभव घेतला.
दर १२ वर्षांनी भरणारा हा मिनी कुंभमेळा १२ दिवस म्हणजे येत्या २४ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील हजारो भाविक दररोज पवित्र स्नानासाठी सिरोंचा येथे दाखल होत आहेत.
जीवनात पहिल्यांदा असा अनोखा अनुभव घेतला. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर हैदराबादहून या ठिकाणी आलो आहे, असे सांगत लॅमव्हीव या स्वित्झर्लंड देशाच्या युवकाने सांगितले. कामानिमित्त हा युवक हैदराबादला आला. त्यांच्या मित्रानी बातम्यांमधे या पुष्कर मेळ्याची माहिती वाचून सिरोंचा येथे येण्याचे ठरविले.
विशेष म्हणजे त्याने पायात काहीही न घालता भर दुपारी अर्धा तास घाटावर भ्रमंती केली व पुष्कर बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी अनवाणी चालत असलेल्या या भाविकाकडे सर्व उपस्थितांच्या नजरा लागलेल्या होत्या.