लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे कुठे आग लागली याची माहिती आता थेट सॅटेलाईट अलर्टने मिळत असल्यामुळे वणवे नियंत्रणासाठी वनविभागाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे.गडचिरोली, वडसा, आलापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही विभागातील जंगलात दरवर्षी वणवे पेटतात. परंतू जास्तीत जास्त वणव्यांचे प्रमाण कोणत्या भागात आहेत याचे निरीक्षण करून यावर्षी नियोजन आराखडा करण्यात आला आहे. वनविभागाला त्यासाठी दिड कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. गेल्या १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गावागावात याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच मोहफूल वेचणाऱ्यांना घेऊन झाडाखालील कचरा जमा करून त्याला नियंत्रित राहणारी आग कशी लावायची याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वणवे लागणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यावी याचीही माहिती सांगण्यात आली. आग लागलेल्या क्षेत्राची अचून माहिती उपग्रहांमधून थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्यांपासून तर वनपालापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे आग त्वरित नियंत्रणात आणण्यासाठीची प्रक्रिया करणे वनविभागाला सोपे जाणार आहे. गेल्यावर्षी (२०१८) मध्ये आगीच्या सर्वाधिक १३४२ घटना उघडकीस आल्या होत्या. त्यात २६८३ हेक्टर जंगलात आग पसरली होती.प्रत्येक वनरक्षकाकडे फायर ब्लोअरवणवा लागल्यास तो आणि पसरू नये यासाठी ठिकठिकाणी फायर लाईन (जाळ रेषा) तयार केल्या जात आहेत. ३ ते १२ मीटर रुंदीच्या आणि वन डेपोच्या ठिकाणी ४० मीटरपर्यंतच्या फायर लाईन तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ७३५ वनक्षकांकडे फायर ब्लोअर हे यंत्र देण्यात आले आहे. त्यातून निघणाºया हवेच्या दाबाने पालापाचोळा साफ होऊन आग पसरण्यापासून रोखता येते. याशिवाय आग विझवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.वणवा लागण्याची कारणेमोहफूल वेचण्यासाठी झाडाखालील पालापाचोळा, गवत नष्ट व्हावे म्हणून गावकºयांकडून तिथे आग लावली जाते. ती आग पसरून जंगलात वणवा पेटतो.जंगलातील गवत जाळल्याने तेंदूपत्त्याच्या झाडाला फुटवा चांगला येतो, असा समज आहे. त्यातून अनेक वेळा वणवे भडकविले जातात.शेतकरी वर्ग शेताच्या बांध्याला साफ करण्यासाठी तेथील गवताला आग लावतात. ती आग पसरत जंगलाच्या दिशेने जाऊन वणवा लागतो.
वनवणव्यांच्या नियंत्रणासाठी वनविभाग सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:55 AM
एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन केले जात आहे.
ठळक मुद्देसहा सेटलाईटची राहणार नजर : प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृतीवर भर