लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे. अतिक्रमणधारकांचे साहित्य तसेच दुचाकी वाहने, सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत.१ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वनविभागामार्फत वन्यजीव सप्ताह राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधून गोकुलनगर लगत असलेल्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिक झुडूपी जंगलाच्या परिसरात जागेची आखणी करीत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात वनपरीक्षेत्र अधिकारी डी.व्ही. कैलुके यांनी वनपरीक्षेत्रातील संपूर्ण कर्मचाºयांना घेवून अतिक्रमीत क्षेत्रात धडक कारवाई राबविली. जागेवर कब्जा करण्यासाठी लावलेले रिबिन काढून टाकण्यात आले. घटनास्थळावर चुन्याने आखणी करीत असलेल्या लोकांकडून साहित्य हस्तगत केले. तसेच त्यांच्याकडील दुचाकी वाहने जप्त करून वनविभागाच्या वाहनाने वनविभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले.कारवाई राबविताना क्षेत्रसहायक जेणेकर, काळे, हेमके, साखरकर, वनरक्षक कवडो, ठाकरे, राठोड, चव्हाण, मट्टामी, बोरकुटे, बोढे, भसारकर, धुर्वे, मुनघाटे, अलोणे, दुर्गे, लोणारे, धात्रक, कापकर, टोंगे, कोडाप, शिंदे, दुधबळे, गरफडे, डिकोंडावार, रायपुरे, मडावी, सयाम, दिगे व वनपरीक्षेत्रातील वनमजूर उपस्थित होते.वनविभागाने केलेल्या या कारवाईचा तपशील वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. सदर कारवाईमुळे शहरातील अतिक्रमधारक धास्तावले असल्याचे दिसून येत आहे.गोकुलनगरलगतचा तलाव व इतर ठिकाणचे अतिक्रमण कायमचगडचिरोली शहरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून जमीन व प्लॉटचे भाव वाढले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून जागा कब्जात घेत आहेत. महसूल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या गोकुलनगर लगतच्या तलावात अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. याशिवाय चामोर्शी मार्ग तसेच धानोरा मार्गालगतही अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र शहरातील या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भातील तक्रारी करूनही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. मात्र कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नसल्याने अतिक्रमण कायम असल्याचे दिसून येते.
वनविभागाने अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 1:29 AM
शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे.
ठळक मुद्देधडक कारवाई : वाहने जप्त करून चामोर्शी मार्गावरील वनजमीन केली मोकळी