तेंदूपत्ता, बांबू, मोहफूल याच्या संकलनावर होणार कामगडचिरोली : वन समृद्धीने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सेमानादेव पर्यटन संकुल आणि वन उद्यानात ‘फॉरेस्ट इंडस्ट्रियल पार्क’ बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात अभ्यास करून ३० एप्रिल २०१६ पर्यंत अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून ७८ टक्के घनदाट जंगल आहे. येथील मूल निवासी आदिवासी जंगलाचे संरक्षण करीत आहेत. त्यामुळे येथील जंगलाचे अस्तित्व आजही टिकून आहे. जिल्ह्यातील शेकडो गावातील ग्रामीण आजही जंगलाचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत. या कामासाठी धानोरा तालुक्यातील लेखामेंढा गाव आदर्श ग्राम म्हणून समोर आले आहे. जंगलात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या वनऔषधीचे संवर्धन करण्यासाठी वन विभागाच्या वतीने ‘फॉरेस्ट इंडस्ट्रियल पार्क’ निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वन विभागाच्या जमिनीवर वन औषधी केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. येथे विविध १८ प्रकारच्या वन औषधी तयार केल्या जातील. सर्व वन औषधीसाठी विपणन व तांत्रिक प्रक्रियेची सुविधा येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. या कामासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या देसाईगंज वन विभागांतर्गत वडसा, गडचिरोली वन विभागांतर्गत सेमाना देवस्थान परिसर, चामोर्शी तालुक्यांतर्गत मार्र्कं डादेव, घोट येथे वन उद्यान तयार करण्यात येणार आहे. तिथेच वन औषधी केंद्र आहे. गडचिरोली वन विभागाच्या वतीने वन औषधी संदर्भात जिल्ह्यातील वैदूंपासून अधिक माहिती गोळा केली जात आहे. मागील वर्षी येथे वैदूंचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यासोबातच मोहा फुलाचे शरबत आणि सहद बनविण्याचा उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे. चांदाळा येथे महिला बचत समुहाच्या माध्यमातून हा उपक्रम चालविल्या जात आहे. वन विभाग महिला बचत समुहातील महिलांना उद्योगीनी बनविण्यसाठी व बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर गडचिरोली-चामोर्शी मार्गावर सेमानादेव पर्यटन संकुल आणि वन उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. वन विभागाच्या वतीने येथे जैवविविधतेचे जतन करण्यासाठी विविध प्रकारच्या वनऔषधी तयार करण्याचे काम सुरू आहे. येथे राशी, नक्षत्र, पंचवटी वन, ग्रहवन, पंचायत वन, सप्तमीवन, सुगंधित वनस्पती, अशोक वन, गणेश वन, नंदनवन, त्रिफलावन, बेलवन, जैव इंधन वन, प्राकृतिक रंगद्रव वन, लाख वन, डिंग वन, बांस संग्रहाल, बाल उद्यान, पत्थर उद्यान, माहिती केंद्र, पक्षी उद्यान, गुलाब वन तथा अन्य प्रकारचे उद्यान तयार करण्यात आले आहेत. येथे वन औषधीचे रोपवन केले जात आहे.विदर्भात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र असून येथे तेंदूपत्ता, बांबू तोडसोबतच मोहफूल संकलन व अन्य वनउपजांचे संकलन कार्य केले जात आहे. मोहफुलाचे महत्त्व आणि त्याचा फायदा यावर अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यांचे समितीचे गठन राज्य सरकारने केले आहे. ही समिती ३० एप्रिलपर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘फॉरेस्ट इंडस्ट्रियल पार्क’ चा ३० एप्रिलपर्यंत अहवाल मागितला
By admin | Published: February 12, 2016 1:52 AM