सिरोंचा : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वनजमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठमोठी झाडे तोडून अतिक्रमण केले जात आहे.
खासगी वाहनांचे अतिक्रमण वाढले
कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली तरी कुरखेडा येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविना
कोरची : शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांनी वर्गणी गोळा करून वीज जोडणी घेतली. मात्र वीज बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या शाळासुद्धा विजेविनाच आहेत.
कुरखेडातील नळ जोडणी तपासणी करा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
कला दालनातील दुकान गाळे रिकामेच
गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांच्या कार्यकाळात पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनाच्या परिसरात व्यवसायासाठी दुकान गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तीन दुकान गाळे वगळता इतर सात ते आठ दुकान गाळे चढत्या दरामुळे रिकामे आहेत. प्रशासनाने भाडेतत्त्वावरील दर कमी करून ते द्यावेत, अशी मागणी आहे.
आष्टी येथे पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
आष्टी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. नगर परिषदेने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.
जिल्ह्यात अपुरी अग्निशमन व्यवस्था
एटापल्ली : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यामध्ये १६४८ गावे आहेत. घटनांच्या वेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
झाडीपट्टीचे नाट्य कलावंत उपेक्षितच
देसाईगंज : ग्रामीण भागात समाजप्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतापुढे वृद्धापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. शासनाचे मात्र या झाडीपट्टीतील कलावंताकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
ग्रामीण भागातील रस्त्याची रुंदी वाढवा
कुरखेडा : तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यावरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जाते वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढवावी.
सोमनूरच्या विकासाकडे दुर्लक्ष
सिरोंचा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून हजारो भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे सोमनूरचा विकास करणे गरजेचे झाले आहे.