अहेरी (गडचिरोली) : माजी राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या बंगल्यावर तैनात पोलीस जवानाने सोमवारी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर त्यामागील नेमके कारण काय, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
या पोलिसाने कौटुंबिक कारणातून हे घडल्याचे सांगितले असले, तरी मृत शिपायाच्या नावावर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) एका पोलीस अधिकाऱ्याला यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी त्या चिठ्ठीबद्दल अनभिज्ञता दाखविल्यामुळे ती चिठ्ठी आली कुठून, याचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
हितेश भैसारे (वय ३६) या नाईक पोलीस शिपायाने सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजताच्यासुमारास अहेरी येथील ‘रुक्मिणी महल’ या राजे अम्ब्रिशराव यांच्या राजवाड्याच्या आवारात आत्महत्या केली. भैसारे हे नक्षलविरोधी पथकात (सी-६०) कार्यरत होते. पण त्यांची काही दिवसांपूर्वीच बदली करून त्यांच्याकडे अम्ब्रिशराव यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली होती.
काय आहे त्या चिठ्ठीत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या चिठ्ठीत नमूद केल्यानुसार, भैसारे हे सी-६० पथकात कार्यरत असताना, कुठल्याशा मुद्द्यावरून त्यांची प्रभारी अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर भैसारे सुटीवर गेले. त्यादरम्यान भैसारे यांना न विचारता त्यांना सी-६० पथकातून काढून अहेरीतील प्राणहिता उपमुख्यालयाशी जोडण्यात आले. त्यामुळे त्यांचा विशेष कमांडो भत्ता बंद झाला. यातून आर्थिक ताण वाढला. या परिस्थितीसाठी सी-६० पथकाचे प्रभारी अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप त्या चिठ्ठीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात अनेक लोकांचे बयाण घेण्यात आले. आतापर्यंत तरी ही घटना कौटुंबिक कलहातून झाल्याचे दिसून येते. अजूनपर्यंत आम्हाला ‘ती’ सुसाईड नोट मिळाली नाही. ती मिळाल्यानंतर त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. भविष्यात या तपासात काही वेगळे आढळून आल्यास त्याचे पुरावे गोळा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- श्याम गव्हाणे, पोलीस निरीक्षक, अहेरी