लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक फेसबुक, व्हाॅटस्ॲप या समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकतात. काही नागरिक या मजकुराचा चिकित्सक पद्धतीने विचार न करता त्याला लाइक, शेअर किंवा फाॅरवर्ड करतात. अशा मजकुराविषयी एखाद्याने पाेलीस ठाण्यात तक्रार केल्यास हा मजकूर लाइक, शेअर किंवा फाॅरवर्ड करणाऱ्यावर गुन्हा दाखल हाेऊन त्याला जेलची हवा खावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंटरनेट स्वस्त झाल्यापासून समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेला मजकूर खरा की खाेटा, हे तपासण्याची काेणतीही यंत्रणा नाही. कधी- कधी दाेन समाजात तेढ निर्माण हाेईल, असे लिखाण केले जाते, तर कधी- कधी एखादी संस्था, नागरिक यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने मजकूर तयार करून टाकला जातो. या मजकुराची काेणतीही शहानिशा न करता ताे काही नागरिकांकडून फाॅरवर्ड केला जाते. या मजकुराच्या माध्यमातून ज्याची बदनामी झाली आहे. अशा व्यक्ती याबाबत पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करते. सायबर विभागामार्फत याची तपासणी करून मजकूर निर्माण करणाऱ्याचा, तसेच ताे शेअर करणाऱ्याचा शाेध घेतला जाते. त्यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला जाते.
मुलींच्या फाेटाेंचा दुरुपयाेग हाेण्याची शक्यता - व्हाॅटस्ॲप, फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर मुली फाेटाे टाकत असतात. या फाेटाेंचा दुरुपयाेग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साेशल मीडियाचा वापर करताना मुलींनी सजग असणे आवश्यक आहे. - मुलींनी फेसबूकचा वापर करताना स्वत:ची प्राेफाईल लाॅक करून ठेवावी, जेणे करून मित्रांव्यतिरिक्त इतर व्यक्ती फेसबूकवरील माहितीचा दुरूपयाेग करू शकणार नाही.
सायबर विभागाकडे वर्षभरात जवळपास १०० तक्रारी साेशल मीडियाचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र सायबर सेल कार्यरत आहे. या विभागाकडे वर्षभरात जवळपास १०० तक्रारी प्राप्त हाेतात. यामध्ये समाजमाध्यमांच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी करणे, फसवणूक करणे, पैशाची मागणी करणे, बनावट अकाउंट तयार करून पैसे मागणे, पिन क्रमांक मागून पैसे गहाळ करणे आदी तक्रारींचा समावेश आहे.
...अशी काळजी घ्याएखाद्या मजकुराचा चिकित्सक अभ्यास केल्याशिवाय ताे लाइक, शेअर किंवा फाॅरवर्ड करू नका. आक्षेपार्ह मजकुरावर प्रतिक्रिया देऊ नका. काही व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये दुसऱ्या समाजाविषयी तेढ निर्माण हाेईल, असा आक्षेपार्ह मजकूर सातत्याने टाकला जातो. अशा ग्रुपमधून लेफ्ट हाेणे चांगले. फेसबुकवरील आपले फाेटाे, प्राेफाइल मित्रांव्यतिरिक्त इतरांनी बघू नये यासाठी प्राेफाइल लाॅक करून ठेवा. तेवढीच सुरक्षितता वाढेल.
स्वतंत्र कायदासायबर गुन्हा घडल्यास आराेपीवर कारवाई करण्यासाठी आयटी ॲक्ट २००० हा स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला आहे. कलम ६३, ६६ बी, डी, के, ई, ६७ अंतर्गत कारवाई हाेऊ शकते.
एटीएम ब्लाॅक झाला, लाॅटरी लागली, एखादे बक्षीस मिळणार, बँकेमधून बाेलताे, असे सांगून बँक खात्याची माहिती मागितली जाते. अशावेळी खात्याची माहिती, तसेच एटीएम पिन कधीच देऊ नये. फेसबुकवरील स्वत:ची प्राेफाइल लाॅक करून ठेवावी. जेणेकरून आपली माहिती, फाेटाे इतरांना बघता येणार नाही. एखाद्याचे बनावट अकाउंट तयार करून मित्र असल्याचे भासवून पैशाची मागणी करीत असेल, तर सावध राहावे. आपला मित्र पैशासाठी फाेन करेल, फेसबुकवर कशाला पैशाची मागणी करेल, हा साधा विचार करावा. साध्या- साध्या गाेष्टींकडे लक्ष दिल्यास आपली फसवणूक हाेणार नाही. आक्षेपार्ह मजकूर फाॅरवर्ड करू नये. -कुंदन गावडे, पाेलीस निरीक्षक सायबर शाखा, गडचिराेली