गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनधिकृतपणे आणि चोरट्या मार्गाने दारूची आयात करणाऱ्या दोन कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडून त्यातील दारूसाठा आणि कार जप्त केल्या. या गुन्ह्यात एकूण ४ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका टाटा सफारी आणि दुसऱ्या एका छोट्या कारमधून दारूचा पुरवठा केला जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दारू पुरवठा केला जाणार असल्याचे कळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या मार्गदर्शनात पथकाने नाकेबंदी केली.
संबंधित संशयास्पद कारची तपासणी केली असता त्या दोन्ही कार मिळून २ लाख १७ हजार ६०० रुपये किमतीचे देशी-विदेशी दारूचे २४ खोके आढळले. तो सर्व मुद्देमाल आणि कार जप्त करून अहेरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारसोबत असलेल्या ४ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास अहेरी पोलीस करीत आहेत.