कोरची : पोलीस विभागाच्या पुढाकाराने आणि ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ या योजनेतून आयोजित चार दिवशीय महाआरोग्य शिबिराला मंगळवारी सुरूवात झाली. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त ४३० नागरिकांची तपासणी केली.
कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे यांनी सकाळी ११ वाजता फित कापून या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी कोरचीचे तहसीलदार सी.आर. भंडारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सदरूद्दीन भामानी, कोरची तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल अंबादे, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल राऊत, डॉ.आशिष इटनकर, डॉ.सचिन बरडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मयुरी मच्छीरके तथा आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात आयोजित हे शिबिर २३ ते २६ फेब्रुवारी असे चार दिवस चालणार आहे.
याप्रसंगी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरची शहर व परिसरातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आरोग्याबाबत त्यांना मार्गदर्शनही केले. ग्रामिण रुग्णालयातील वैघकीय अधीक्षक डॉ.बागराज धुर्वे म्हणाले, डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी एका दिवशी १५ रुग्ण घेतले जाणार आहेत. त्यापेक्षा जास्त असतील तर त्यांची जिल्हास्तरावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठविले जाईल. या शिबिरात चारही दिवस विविध आजारांवर उपचार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
(बॉक्स)
या आजारांच्या रुग्णांची तपासणी
या महाआरोग्य शिबिरामध्ये बाहेरून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात इतर डॉक्टरांनी उच्च रक्तदाब तपासणी ४५ नागरिक, मधुमेह तपासणी ३५, गरोदर माता तपासणी १५, त्वचारोग तपासणी १७, अस्थिरोग तपासणी ५, नेत्र तपासणी ३८, हर्निया तपासणी ९, हायड्रोसील तपासणी ७ व इतर २४० जणांची तपासणी अशी एकूण ४३० नागरिकांची मंगळवारी तपासणी करण्यात आली.