दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असली तरी मजुरांना कामाचा मोबदला मिळत नसल्याने या योजनेबाबत मजुरांमध्ये नाराजीचा सूर आहे. बाराही तालुक्यांतील जवळपास ४३ हजार मजुरांची ७ कोटी ६४ लाख रुपयांची मजुरी प्रलंबित आहे. परिणामी जिल्हयातील मजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. १७ जुलैपासून आतापर्यंत केलेल्या कामाच्या मजुरीची रक्कम मिळाली नाही. याबाबत शासनस्तरावर कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे व हाताला काम देण्याबरोबरच या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जातात. मात्र, काम करूनही मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा न झाल्याने मजूर बँकेत व पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून थकले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ४३ हजार मजुरांची ७ कोटी ६४ लाखांची मजुरी थकली आहे.
रोजगार हमी योजनेतून केंद्र सरकारच्या वतीने नोंदणीकृत मजुरांना १०० दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत यंत्रणा स्तरावर ५० टक्के आणि ग्रामपंचायत स्तरावर ५० टक्के कामे केली जातात. यात कायद्यान्वये कुशल कामे ४० टक्के तर अकुशल कामाचे प्रमाण ६० टक्के ठेवणे आवश्यक आहे. रोहयोअंतर्गत जनावरांचे गोठे, फळबाग, शेळी शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, नाडेप खत, गांडूळ खत, वैयक्तिक शौचालय, नवीन सिंचन विहीर अशा १४ प्रकारच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.
विलंब शुल्काची तरतूद, पण मिळते का? रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची १५ दिवसांच्या आता त्यांच्या मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तसा रोहयो'चा नियम आहे. खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क अर्थात व्याजानुसार मजुरीची रक्कम अदा केली जाते. विलंबासाठी जबाबदार असलेल्यांकडून ही रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे.
रोहयो प्रलंबित मजुरी, कुशल कामाचा तपशील तालुक्याचे नाव मजूर संख्या प्रलंबित अकुशल मजुरी (रक्कम) प्रलंबित साहित्याची (रक्कम करोड)अहेरी ३४३५ ६५४६६९१ ६५६.६६ आरमोरी २६६५ ४२८५४८३ २५५.६० भामरागड १२६३ २०४९६७० १५३.६५ चामोर्शी ७१४७ १२२१७७१५ २०४४.०९ देसाईगंज ४०६९ ७३८३८७१ ३०७.७१ धानोरा ७००१ ११०५५२४० ४५५.१९ एटापल्ली २५७२ ४९८२१६० ४०३.११ गडचिरोली ४५२३ ८२६७०५१ ६९४.०३ कोरची ३२७४ ५९०९८२३ ५०९.०६ कुरखेडा ४६७९ ७६१८१९३ ७१२.४४ मुलचेरा ८७९ १५०१४६७ ६२८.७८ सिरोंचा २३७७ ४५९८७२९ १८९.८५ एकूण ४३८८४ ७६४१६०९१ ७०१०,१५