१४ जखमी : कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी येथील घटना; बेडगाव घाटावर ट्रॅक्टर उलटलीगडचिरोली : जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा येथे तर शुक्रवारच्या रात्री देसाईगंज व आरमोरी येथे झालेल्या एकूण तीन अपघातात चार जण ठार तर १४ जण जखमी झाल्याची घटना घडली. कुरखेडा - येथील अपघातात ठार झालेल्यांमध्ये सुकमाबाई दयाराम बोगा (४०), रूपेश कुबेल हलामी (१९) व ज्ञानेश्वर कुसन उईके (२५) रा. डोंगरगाव ता. कुरखेडा यांचा समावेश आहे. देसाईगंज येथे झालेल्या अपघातात पीतांबर पिल्लारे (३६) रा. देसाईगंज याचा जागीच मृत्यू झाला. कुरखेडा-कोरची मार्गावरील बेडगाव घाटावर ट्रॅक्टर उलटून तीन मजूर ठार तर ११ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. कोरची तालुक्यात मोठ्या विद्युत वाहिनीचे बांधकाम सुरू असल्याने डोंगरगाव येथील काही मजुरांना घेऊन एमएच-३६-एल-२८९७ हा ट्रॅक्टर जात होता. दरम्यान, बेडगाव घाटावर ट्रॅक्टरचालक रूपेश तलमले (३०) याचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. यात दोन मजूर जागीच ठार तर एक मजूर कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दगावला. तसेच या अपघातातील ११ जखमींमध्ये प्रदीप दयाराम बोगा (२०), ट्रॅक्टर चालक रूपेश तलमले (३०), राजेश सुकराम हलामी (२०), दिलीप रामलाल कुमोटी (२५), रविना हिडामी (१६) यांचा समावेश आहे. या पाच जणांना प्राथमिक उपचारानंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मंगला सुखराम हलामी (१७), फुलमा जयराम बोगा (१८), सुनील किरंगे (२०), सुनील बोगा (२५), शिल्पा बोगा (१५), रमेश बोगा (१८) यांचेवर कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. कुरखेडाच्या अपघातातील तीन मृतक व जखमी ११ मजूर हे सर्व कुरखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहेत. तर ट्रॅक्टर चालक रूपेश तलमले हा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील रहिवासी आहे. सदर अपघात झाल्याचे याच मार्गावरून येत असलेले आरमोरीचे माजी आ. आनंदराव गेडाम, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे माजी पं. स. उपसभापती परसराम टिकले, प्रभाकर तुलावी यांच्या निदर्शनास आला. त्यांनी पुराडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलाविले. दरम्यान, काही जखमींना आपल्या वाहनात बसवून कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले. गंभीर पाच मजुरांना नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. सदर अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, जि. प. सदस्य अशोक इंदुरकर, पं. स. सभापती बबन बुद्धे, आशिष काळे, राकेश चव्हाण, दिवाकर मारगाये, विजय पुस्तोडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. संबंधित विद्युत वाहिनी कंत्राटदाराला रुग्णालयात बोलावून या अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तर जखमींना उपचाराचा खर्च देण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. कंत्राटदाराने मागणी मान्य करीत आर्थिक मदत देण्याची कबुली दिली.देसाईगंज - देसाईगंजवरून आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे नाट्य प्रयोगासाठी जात असलेल्या दुचाकीस्वार युवकास विरूद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास कोंढाळा गावासमोर घडली. पीतांबर पिल्लारे (३६) रा. विर्शी वॉर्ड देसाइगंज असे मृतकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला युवक सचिन मेश्राम हा जखमी झाला. पीतांबर पिल्लारे हा नाट्य प्रयोगात कॅशिओ वाजविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत होता. दरम्यान शुक्रवारी रात्री वैरागड येथे नाट्य प्रयोगासाठी पीतांबर पिल्लारे व सचिन मेश्राम हे दोघेजण दुचाकीने जात होते. विरूद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात पीतांबर पिल्लारे हा जागीच ठार झाला. तर सचिन मेश्राम हा गंभीर जखमी झाला. सचिनने या अपघाताची माहिती भ्रमणध्वनीवरून आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर सचिनला देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. आरमोरी - येथून चार किमी अंतरावर गाढवी नदीजवळ शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दुचाकीची उभ्या कंटेनरला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रवींद्र देवराव चिळंगे (२६), लक्ष्मीकांत पत्रूजी चिळंगे (२६) दोघेही रा. गिलगाव ता. चामोर्शी असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. रवींद्र व लक्ष्मीकांत हे आपल्या मित्रांसोबत दुचाकीने आरमोरीला नवरात्र उत्सव बघण्याकरिता जात होते. दरम्यान गाढवी नदीजवळ बंद स्थितीत उभ्या असलेल्या कंटेनरला समोरून धडक दिली. यात दोघेही जण गंभीर जखमी झाले. या दोघांवर आरोपीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. (लोकमत वृत्तसेवा)
तीन अपघातांत चार जण ठार
By admin | Published: October 18, 2015 1:31 AM