गडचिराेली : पहिल्या पावसानंतर जमिनीत दडून बसलेले साप बाहेर पडतात. त्यानंतर उष्ण व दमट जागेचा आश्रय घेण्यासाठी ते धडपडतात. अशावेळी मानवी वस्तीकडेही ते धाव घेतात. गडचिराेली जिल्ह्यात प्रामुख्याने विषारी सापांच्या चार प्रजाती आढळून येतात. याशिवाय दाेन प्रजाती निमविषारी, तर १४ प्रजातींचे साप बिनविषारी आहेत. पावसाळ्यात सापांपासून अधिक धाेका असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
गडचिराेली जिल्ह्याचा बहुसंख्य भाग जंगलव्याप्त आहे. बहुतांश घरे जंगलाला लागून आहेत. त्यामुळे वस्तीकडे अनेकदा साप धाव घेतात, तसेच जिल्ह्यातील लाेकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने शेती तसेच रानावनाशी नागरिकांचा संपर्क येताे. अशावेळी सापांपासून धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी केवळ सर्पमित्रच नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही विषारी व बिनविषारी सापांची ओळख असणे आवश्यक आहे; अन्यथा प्रत्येक साप विषारी समजूनच त्याचा बळी घेतला जाताे. अज्ञानामुळे दरवर्षी लाखाे सापांचा बळी नागरिकांकडून घेतला जात असल्याने जीवसृष्टीला हानी पाेहाेचते.
बाॅक्स...
साप आढळला तर...
- साप आढळून आल्यास विनाकारण त्याचा बळी घेऊ नये. वन्यजीवप्रेमी अथवा सर्पमित्राला माहिती द्यावी.
- साप वस्तीत असल्यास ताे काेणता साप आहे, याबाबत सर्वप्रथम खात्री करावी, त्यानंतरच त्याला प्रशिक्षित अथवा अनुभवी सर्पमित्रांद्वारे मानवी वस्तीच्या बाहेर नेऊन साेडावे.
- अप्रशिक्षित व सापांविषयी जाण नसलेल्या व्यक्तीने सापांशी खेळ करू नये.
- नागासारखे विषारी साप चपळ असतात. त्यामुळे त्यांना पकडण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नये.
बाॅक्स...
साप चावल्यास हे करावे
- दंश करणारा साप विषारी की बिनविषारी याची सर्वप्रथम खात्री करावी.
- दंश करणारा विषारी साप असल्याचे माहीत झाल्यास गुडघ्याच्या खाली किंवा वर दाेरी किंवा पट्टी बांधावी. त्यानंतर लगेच प्राथमिक आराेग्य केंद्र किंवा ग्रामीण, जिल्हास्तरावरील रुग्णालयात उपचारासाठी जावे.
- बुवाबाजी अथवा फुकफाक तसेच गावठी जडीबुटीवर विश्वास ठेवून उपचार करू नयेत.
- पीडित व्यक्तीने घाबरू नये. हृदयाचे ठाेके वाढू देऊ नयेत.
बाॅक्स...
...हे आहेत बिनविषारी साप
गडचिराेली जिल्ह्यात मांजऱ्या व हरणटाेळ आदी दाेन निमविषारी साप वगळल्यास १४ बिनविषारी साप आढळतात. यामध्ये दिवट (धाेंड्या), नानेटी (वासुदेव), धामण, तस्कर, डुरक्या घाेणस (चिखल्या), धूळनागीण, कुकरी, गवत्या, रुक्या, कवळ्या, साेंगाट्या, अजगर, मांडूळ, चंचुवाडा (कान्हाेळा) आदींचा समावेश आहे. विषारी व निमविषारी साप वगळता अन्य काेणत्याही सापापासून जिवंत व्यक्तीला धाेका हाेत नाही. त्यामुळे बिनविषारी सापाबाबत जागृतीची गरज आहे.
काेट...
साप आढळून आल्यास ताे विषारी की बिनविषारी याची ओळख हाेणे गरजेचे आहे. मानवी वस्तीत साप आढळून आल्यास सर्पमित्रांना याबाबत माहिती द्यावी किंवा रस्त्यातील वाटेत साप आढळून आल्यास त्याला न डिवचता जाऊ द्यावे. विषारी व बिनविषारी सापातील फरक कळत नसल्याने धाेका नसलेल्या सापांचाही बळी घेतला जाताे.
-अजय कुकडकर, सर्पमित्र, गडचिराेली
बाॅक्स...
नाग... जिल्ह्यातील प्रमुख विषारी सापांमध्ये नागाचा समावेश आहे. या सापाची लांबी पाच ते सहा फूट असते. अत्यंत जहाल विषारी साप म्हणून याची ओळख आहे.
मण्यार... मण्यार व पट्टेरीमण्यार हे दाेन साप जिल्ह्यात आढळून येतात. पट्टेरीमण्यारवर काळ्या-पिवळ्या-पांढऱ्या पट्ट्या असतात, तर मण्यारवर सफेद गाेलाकार दांड्या असतात.
घाेणस... घाेणस हा साप साेनेरी पिवळसर व अंगावर रुद्राक्षाप्रमाणे गाेल चट्टे व त्यावर तपकिरी पांढरी किनार असते व या सापाचे डाेके चापट असते.
फुरसे... सर्वांत लहान विषारी साप म्हणून फुरसे सापाची ओळख आंहे. फिकट तपकिरी, शरीरावर पांढरी नागमाेडी जाळीदार नक्षी, खवल्यांवर दाते असल्या प्रकारचा हा साप आहे.