लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : छत्तीसगड राज्यातून आरमोरी तालुक्यात येणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू कुरखेडा पोलिसांनी गोठणगाव नाक्यावर सापळा रचून पकडला. यात दोन वाहनांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. यात जप्त केलेल्या सुगंधित तंबाखूची किंमत ७ लाख ४६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.छत्तीसगड कडून येणाऱ्या अवैध तंबाखूची शहराचा बायपास असलेला गोठणगाव नाक्याकडून जिल्ह्यातील अन्य तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान नाक्यावर सापळा रचला. यावेळी छत्तीसगड वरून कोरची-कुरखेडा मार्गे एक मिनी ट्रक (सीजी ०८, बी १७७३) आणि पीकअप कार (एमएच ३३ टी २३७२) संशयितरीत्या येताना दिसून आले. या वाहनांना थांबवत झडती घेतली असता त्या वाहनात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा दिसून आला. त्याची एकूण किंमत ७ लाख ४६ हजार आहे. दोन्ही वाहन जप्त करण्यात आले असून आरोपी साधू गावडे रा. बोगाटोला जि. राजनांदगाव (छत्तीसगड) व सलीम माखानी याच्याविरोधात भादंवि २७२, २७३, १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, ठाणेदार अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, शिपाई ललीत जांभूळकर, नितीन नैताम, रूपेश काळबांधे यांच्या चमूने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.