प्राप्त माहितीनुसार, दिनकर रामसाथ कोडाप यांनी रांगी येथील पोस्ट ऑफिसमध्ये ११ फेब्रुवारी २००७ ला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत स्वरिका दिनकर कोडाप या नावाने खाते उघडले. प्रथम खात्यात १००० रुपये भरले. त्यानंतर ३१ मार्च २०१८ ला ११ हजार, ७ सप्टेंबर २०१९ ला १२ हजार आणि १ जुलै २०२० रोजी ९ हजार २०० रुपये प्रत्यक्ष पोस्टात जाऊन भरले. पोस्ट मास्तरने पासबुकमध्ये त्याची नोंद घेऊन शिक्केही मारून दिले. मात्र, २४ जुलै २०२१ रोजी गडचिरोली उपडाकघरचे उपविभागीय निरीक्षक कविन्द्र भस्मे यांनी पासबुक तपासणीकरिता रांगी येथे बोलविले असता, कोडाप यांच्या खात्यावर फक्त १३७६ रुपये आढळले. बाकीचे ३५ हजार रुपये गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार नंतर अनेकांच्या बाबतीत घडल्याचे समोर आले.
रांगीच्या या पोस्ट ऑफिसमधून सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातील पैशाची अफरातफर झाल्याचे यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. याबाबत चौकशी करून गहाळ झालेली रक्कम खात्यात जमा करावी आणि संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी दिनकर कोडाप, संजय गडपायले, नरेन्द्र भुरसे, जयंत साळवे, निकेश्वर पटले, हेमचंद जांभुळकर, विलास नाकतोडे, देवानंद चापले यांच्यासह इतर खातेदारांनी केली आहे.
(बॉक्स)
पासबुकवर पैसे, ऑनलाइनमधून गहाळ
या डाकघरात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सेव्हिंग खाते, पॉलिसी, आरडी व सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पैशाची गुंतवणूक केली जाते; पण अनेक लोकांनी भरलेल्या पैशाचा हिशेब कुणाला कळलेला नाही. भरलेल्या पैशाची नोंद पुस्तकात केली आहे, असे खातेदारांचे म्हणणे आहे. मात्र, ऑनलाइन खात्यावर पैसेच नसल्याचे अनेकांना दिसून आले. काही लोकांची आरडीची मुदत होऊनही त्यांना पैसेच मिळाले नाहीत, असा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला आहे.
(बॉक्स)
विश्वासार्हता धोक्यात
येथी अनेक लोकांच्या आरडी खात्याच्या मुदत ठेवीचा कालावधी संपूनही त्यांची रक्कम जमा झालेली नाही. अनेक खात्यांत गोंधळ असल्याची बाब समोर येत आहे. मागील काही वर्षांपासून या गोंधळाची तपासणी का केली नाही? अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे आहे का? असे प्रश्न नागरिकांच्या मनात उठत आहेत. विशेष म्हणजे या प्रकारामुळे पोस्ट ऑफिसच्या व्यवहारांवर विश्वास ठेवायचा तरी कसा? असा प्रश्न लोक विचारत आहेत.