गडचिरोली : पूर्वी सर्कशीत किंवा एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी दिसणारे पाळीव हत्ती सर्वांनीच पाहिले आहेत. पण, इतर प्राण्यांप्रमाणे जंगलात मुक्तसंचार करणारे आणि तेसुद्धा एक-दोन नाही, तर तब्बल २३ हत्तींच्या कळपाने पूर्व विदर्भाचे जंगल पालथे घातले आहे. गेल्या १०० वर्षांच्या इतिहासातही एवढ्या संख्येने जंगली हत्ती विदर्भातील कोणत्याच जंगलात आढळले नाही. त्या दृष्टीने २०२२ हे वर्ष ऐतिहासिक ठरले आहे.
मूळच्या ओडिशा राज्यातील जंगलातून तब्बल दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करत पूर्व विदर्भाच्या जंगलात रेंगाळत असलेल्या या हत्तींचे अस्तित्व वन्यजीवप्रेमींसाठी किंवा जैवविविधतेच्या साखळीतून पाहिल्यास सुखद धक्का देणारे आहे. मात्र, या स्वच्छंदी हत्तींना आवर घालणे कोणाच्याही आवाक्यात नसल्यामुळे त्यांचे जंगलाबाहेर पडणे सामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
जंगलातील भरपूर चारा, ठिकठिकाणी असलेले तलाव असे पोषक वातावरण यामुळे हे हत्ती गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत फेरफटका मारून पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावले आहेत. हत्तींना प्रिय असलेले धानाचे पीक आणि घरांमध्ये ठेवलेली मोहफुले याच्या वासामुळे या हत्तींनी अनेक घरे पाडली. धानपीकही फस्त केले. त्या नुकसानाची भरपाई वनविभागामार्फत संबंधितांना दिली जात असली, तरी या हत्तींचे अस्तित्व जंगलाशेजारी गाव आणि शेत असणाऱ्यांना कायम दहशतीत ठेवणारे ठरत आहे.
आतापर्यंत असा झाला हत्तींचा प्रवास
- ओडिशात ‘मयूर झरना’ हे हत्तींसाठी राखीव जंगल आहे. त्याच भागातून काही दिवस झारखंडमध्ये जाऊन हे हत्ती २०१४ मध्ये छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात स्थिरावले होते. जवळपास सात वर्षे त्यांचे वास्तव्य छत्तीसगडच्या जंगलात होते.
- १४ महिन्यांपूर्वी, म्हणजे ऑक्टोबर २०२१ मध्ये या जंगली हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेकडील मुरूमगाव वनपरिक्षेत्रात प्रवेश केला. कुरखेडा, देसाईगंज तालुक्यांतून वैनगंगा नदी ओलांडत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण तिकडे पोषक वातावरण न दिसल्याने काढता पाय घेऊन मार्च २०२२ मध्ये त्यांनी पुन्हा छत्तीसगड गाठले.
- ऑगस्ट महिन्यात पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या या हत्तींनी दीड महिन्यापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात चाऱ्याचा आस्वाद घेऊन आता भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. साकोली, लाखांदूर तालुक्यातून पुन्हा ते गडचिरोली जिल्ह्यात आले. सध्या कुरखेडा तालुक्यात त्यांचे वास्तव्य आहे.