हजारो विद्यार्थी जुन्याच गणवेशात : ८५ टक्के पाल्यांच्या पालकांकडून गणवेशाची खरेदी नाहीदिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जि.प.च्या शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासकीय शाळेत इयत्ता पहिली ते आठवीत सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात शिकणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ६३ हजार ५७८ विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत देण्यासाठी विद्यार्थी व त्याच्या आईचे संयुक्त खाते काढावयाचे होते. मात्र या योजनेत अनेक जाचक अटी व नियम घातल्याने अनेक पालकांना आपल्या मुलांना गणवेशाशिवाय शाळेत पाठवावे लागत आहे. जिल्ह्यात ८५ टक्के पाल्यांच्या पालकांनी आतापर्यंत गणवेश खरेदी केली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण ६३ हजार ५७८ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० हजार पाल्यांच्या पालकांनी नव्या गणवेशाची खरेदी केली आहे. केवळ १५ टक्के पालकांनी गणवेश खरेदी केले असल्याची माहिती जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल १२ दिवसाचा कालावधी उलटूनही ८५ टक्के पाल्यांच्या पालकांनी गणवेशाची खरेदी केली नाही. त्यामुळे शासनाची ही मोफत गणवेश योजना गडचिरोली जिल्ह्यात सध्या तरी फेल झाली असल्याचे दिसून येते. भाजप प्रणित राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मोफत गणवेश योजनेत संबंधित पालकांना आधी गणवेश खरेदी करावयाचे आहेत. त्यानंतर गणवेश अनुदानाची रक्कम विद्यार्थी व त्याच्या आईच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच गणवेश योजनेसाठी पात्र एकूण ६३ हजार ५७८ विद्यार्थ्यांचे एकूण २ कोटी ५४ लाख ३१ हजार २०० रूपयाचा निधी पात्र एकूण १ हजार ५७३ शाळांमधील मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात वळता करण्यात आला. गणवेश खरेदी केल्याच्या बिलाची पावती संबंधित पालक मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर पाल्यांच्या संयुक्त खात्यात दोन गणवेशाचे ४०० रूपये जमा केले जात आहेत. गडचिरोली, देसाईगंज, चामोर्शी व आरमोरी या तालुक्यातील बहुतांश पालकांनी गणवेशाची खरेदी केली आहे. मात्र अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, भामरागड, मुलचेरा तसेच धानोरा, कोरची, कुरखेडा आदी तालुक्यातील पालक गणवेश खरेदीसाठी सक्रीय झाल्याचे दिसून येत नाही. शासन व शिक्षण विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे आदिवासीबहूल, मागास गडचिरोली जिल्ह्यात गणवेश खरेदी योजनेस गती नसल्याचे स्पष्ट होत आहे. विभाग प्रमुखांच्या दौऱ्यात अल्प प्रतिसाद यंदाचे शैक्षणिक सत्र २७ जून पासून सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी जि.प. च्या सर्व विभाग प्रमुखांनी नियोजनानुसार बाराही तालुक्यातील शाळांना भेटी देऊन गणवेश योजनेसह विविध शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. या दौऱ्यात बहुतांश पालकांनी गणवेश खरेदी केले नसल्याचे विभाग प्रमुखांना दिसून आले. अनेक शाळांमधील विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी गतवर्षीच्या जुन्या गणवेशात दिसून आले. तसेच काही विद्यार्थी रंगबेरंगी गणवेशात दाखल झाल्याचे निदर्शनास आले.४०० रूपयांत अशक्यजिल्ह्यातील बहुतांश सर्वसामान्य पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शिवाय वाढत्या महागाईच्या काळात ४०० रूपयांत दोन गणवेश खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे काही पालक एकच गणवेश खरेदी करीत आहेत.शासनाच्या दिशानिर्देशानुसार गणवेश योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. मुख्याध्यापकांनी गणवेश खरेदीसाठी पालकांमध्ये उत्साह निर्माण करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गट शिक्षणाधिकाऱ्यांनाही याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याचे सूचित केले आहे.- एम. एन. चलाख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
मोफत गणवेश योजना ‘फेल’
By admin | Published: July 10, 2017 12:30 AM