गडचिराेली : खाद्यपदार्थ तयार करून विकणारे अनेक व्यावसायिक खाद्यतेलाचा पुनर्वापर अथवा त्याच तेलाचा वारंवार वापर करतात. अशा प्रकारचे खाद्यतेल आराेग्यासाठी हानीकारक असून विविध प्रकारच्या आराेग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अलीकडे कर्कराेग हाेण्याचाही प्रकार वाढला असल्याने नियमित रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये तळलेले पदार्थ खाणाऱ्या शाैकिनांना धाेका आहे. त्यामुळे हाॅटेल अथवा खानावळीत मिळणारे तळलेले पदार्थ नेहमी खाणे टाळावे. अशा प्रकारचे खाद्यतेल वापरणाऱ्यांवर गुन्हासुध्दा दाखल हाेऊ शकताे.
काेट
तेलात तळलेले पदार्थ आराेग्यास धाेकादायकच ठरतात. त्यात पुन्हा वारंवार वापर केलेल्या खाद्यतेलातील पदार्थ असतील तर अती गंभीर आजारांसह मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा धाेका यासारखे विकार व आजार उद्भवू शकतात.
- डाॅ. विनाेद बिटपल्लीवार
गडचिराेली जिल्ह्यात खाद्य तेलापासून पदार्थ तयार करणारे किरकाेळ व्यावसायिक आहेत. ते अल्प प्रमाणातच तेलाचा वापर करतात. त्यामुळे फारसा तेलाचा पुनर्वापर हाेत नाही. अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार अशा दुकानांची तपासणी केली जाते.
- सुरेश ताेरेम, अन्न निरीक्षक
बाॅक्स
तळलेल्या पदार्थात पाेषणमूल्य कमी
सुदृढ आराेग्यासाठी प्रथिने, कर्बाेदके व जीवनसत्वांची याेग्य प्रमाणात आवश्यकता असताे. सर्वसामान्य आहारातूनही यांची पूर्तता हाेते. परंतु तळलेल्या पदार्थांमध्ये पाेषणमूल्य कमी राहत असून उच्च कॅलरी असतात. याचा परिणाम व्यक्तीच्या आराेग्यावर हाेताे. नियमित असे पदार्थ खाणाऱ्यांना समस्या उद्भवतात.
आतापर्यंत चार लाेकांवर दंडात्मक कारवाई
रस्त्यालगत विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या गडचिराेली व देसाईगंज येथील चार व्यावसायिकांवर तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत अन्न व औषध प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सुरूवातीला १२ व्यावसायिकांकडील पदार्थ व तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. परंतु यापैकी केवळ चार व्यावसायिकांचे तपासणी नमुने सदाेष आढळले. यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. असे गुन्हे करणाऱ्यांवर विविध प्रकारे कारवाई केली जाते.