लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय लष्कराच्या ४०० पेक्षा जास्त दुधाळू गाईं शेतकऱ्यांच्या नावावर आणून त्या आपल्याच ताब्यात ठेवण्याचा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीचा डाव ‘लोकमत’मुळे उधळला गेला आहे. मात्र २०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायब असताना आणि त्याबाबत पोलिसात तक्रारही झालेली असताना अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तक्रार देऊन १० दिवस लोटले असताना या गंभीर प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.सदर फसवणूक प्रकरणात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी गेल्या २६ डिसेंबर २०१९ रोजी आरमोरी पोलीस ठाण्यात प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने गाईंची अफरातफर केल्याबाबतची तक्रार दाखल केली. त्यात सदर कंपनीला ४२३ फ्रिजवाल गाई, कालवडी व वासरांसह कंपनीच्या पशुपालक सभासदांना वितरित करण्यासाठी दिल्या होत्या, मात्र कंपनीने ही जनावरे सभासदांना वितरित न करता आपल्याच ताब्यात अनधिकृतपणे ठेवल्या. याशिवाय त्या जनावरांची योग्य निगा न राखल्याने आणि योग्य व्यवस्थापनाअभावी बरीच जनावरे मरण पावली. दि.१९ डिसेंबरपर्यंत केवळ २६९ जनावरे शिल्लक होती. दरम्यान जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने ती जनावरे पशुपालकांना वितरित करण्यासाठी गेले असता १६३ जनावरांची (गायी) परस्पर विल्हेवाट लावल्याने (विक्री केल्याने) केवळ १०६ जनावरे शिल्लक होती.शासकीय मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावणे, अपहार करणे, पशुपालकांना वितवित करावयाच्या गाई स्वत:च्या अखत्यारित ठेवणे याकरिता सदर कंपनीच्या संचालक मंडळावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती उपायुक्तांनी आपल्या तक्रारीत केली आहे. परंतू प्रत्यक्षात त्या तक्रारीवर कारवाई झालेली नाही.प्रशासनावर कुणाचा दबाव?या प्रकरणात चक्क शासन आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अफरातफर करण्यात आल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकाºयांनी तडकाफडकी पोलीस कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार उपायुक्तांनी तक्रारही दाखल केली. मात्र तक्रार देऊन १० दिवस उलटले तरी अद्याप कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात सदर कंपनीला वाचवण्यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी कारवाई का होत नाही, याचेही स्पष्ट उत्तर पोलीस किंवा प्रशासनाकडून दिले जात नाही.शेतकऱ्यांना गाई मिळणार का?सदर प्रकरणात पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) कार्यालयाने पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करून त्याचा अहवाल दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.महेश बन्सोडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आरमोरीजवळच्या शिवणीत जाऊन सदर कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यात झालेला घोळ स्पष्टपणे समोर आला. आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या गाई आल्या त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही. पशुसंवर्धन विभागाने देसाईगंज येथील वळूमाता संगोपन केंद्रावर ठेवलेल्या १०० फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना दिल्या जाणार का, याबद्दलही आता शंका व्यक्त होत आहे.या प्रकरणात जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार दि.२६ डिसेंबरला आरमोरी पोलीस ठाण्यात प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीविरूद्ध तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणाशी निगडित काही कागदपत्रांची मागणी पोलिसांनी केली होती. आमच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे त्यांना पुरविण्यात आली. मात्र कारवाई झालेली नाही. कंपनीने गायब केलेल्या गाईसुद्धा परत दिलेल्या नाही. पोलिसांनी कारवाई का केलेली नाही याबद्दल माहिती नाही. ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ‘रिसिव्ड कॉपी’सुद्धा मिळालेली नाही.- डॉ.वाय.एस. वंजारी,उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, गडचिरोली
फ्रिजवाल गाईप्रकरणी कारवाई गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 5:00 AM
मात्र २०० पेक्षा जास्त गायी रहस्यमयरित्या गायब असताना आणि त्याबाबत पोलिसात तक्रारही झालेली असताना अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तक्रार देऊन १० दिवस लोटले असताना या गंभीर प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देतक्रार करूनही गुन्हा दाखल नाही : शेतकऱ्यांच्या नावावर फसवाफसवीचे प्रकरण गुन्हा थंडबस्त्यात