मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने देसाईगंज येथे गोसंवर्धन व गोपालन मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच गोंडवाना दुधाचा ब्रँड विकसित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या नावावर तयार झालेल्या एका संस्थेला तडकाफडकी गायींचेही वाटप केले. पण प्रत्यक्षात दूध प्रकल्पाचा अद्याप पत्ताच नसून यात शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्यात आल्याचे समोर येत आहे.देशभरात भारतीय लष्कराच्या ठिकठिकाणच्या तळांवर असलेल्या फ्रिजवाल गायींचा सांभाळ करणे लष्कराला परवडणारे नसल्यामुळे या गायी दूध उत्पादनासाठी गरजवंत शेतकऱ्यांना नि:शुल्क दिल्या जात आहेत. त्यासाठी काही अटीही टाकल्या आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सदर फ्रिजवाल गायी आणण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स प्रोड्युसर या कंपनीने प्रस्ताव सादर केला. सदर कंपनीला फ्रिजवाल गायी मिळाल्यास शेतकरी त्या दुधातून आपला ‘गोंडवाना’ दूध ब्रँड विकसित करतील आणि त्यातून सदर शेतकऱ्यांना चांगला जोडधंदा मिळेल असे भासविण्यात आले. त्यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांनी प्रस्तावाची कोणतीही शहानिशा न करता गोंडवाना स्मॉल फार्मर प्रोड्युसर कंपनीला लष्काराच्या ३८३ फ्रिजवाल गायी दिल्या. परंतू प्रत्यक्षात त्या गायी ना शेतकऱ्यांना मिळाल्या, ना दुधाचा ब्रँड तयार झाला. एवढेच नाही तर त्या गायींचे पालनपोषणही व्यवस्थित होताना दिसत नाही.विशेष म्हणजे सदर कंपनीला गायी देण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी गायी वाटपानंतर तांत्रिक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना देण्यात आली. त्यांनी आरमोरी येथील आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची सूचना दिली. मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी गायी ठेवल्या आहेत तिथे गायींची पुरेशी सोयच होत नसल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने सदर गायी त्या ठिकाणी किती दिवस तग धरतील, असा प्रश्न अधिकाºयांना पडला आहे.कंपनीची नोंदणीच गुलदस्त्यातवास्तविक ज्या प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने शासनाच्या ३८३ फ्रिजवाल गायी मोफत लाटल्या त्या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कंपनीचे भागधारक म्हणून शेतकरी आणि कंपनी यांच्यात झालेला करार याबाबतची माहिती पशुसंवर्धन उपायुक्तांनी सदर कंपनीकडे मागितली, परंतू त्यापैकी काहीच सदर कंपनीच्या संचालकांनी आपल्याकडे सादर केली नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सदर प्रकल्पाला भेट दिली असता गायींसाठी शेडही तयार केले नसल्याचे दिसून आल्याचे वंजारी यांनी सांगितले. त्यामुळे सदर कंपनीची नोंदणी झाली आहे किंवा नाही याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जागेचे वांदे कायमअगदी घाईघाईने झालेल्या या एकूण व्यवहारात सदर कंपनीने कागदोपत्री आपल्या प्रकल्पाची जागा वडसा तालुक्यातील डोंगरीमेंढा येथील सर्व्हे नं.३४ येथे दाखविली आहे. परंतू प्रत्यक्षात सदर गायी पुण्यावरून आणल्यानंतर आधी आरमोरी येथील अमोल मारकवार यांच्या शेतात ठेवल्या. त्यासाठी विशिष्ट भाडे देण्याचे मारकवार यांना तोंडी कबूल करण्यात आले. परंतू प्रत्यक्षात भाडे दिलेच नाही. त्यामुळे मारकवार यांनी सदर कंपनीला तेथून हुसकून लावले. त्यानंतर सदर गायी देसाईगंज मार्गावरील शिवणीजवळ हलविण्यात आल्या. हा सर्व खेळखंडोबा पाहता शासनाची दिशाभूल करून गायी लाटण्यात आल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
प्रकल्पाच्या नावावर लाटल्या फ्रिजवाल गायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM
देशभरात भारतीय लष्कराच्या ठिकठिकाणच्या तळांवर असलेल्या फ्रिजवाल गायींचा सांभाळ करणे लष्कराला परवडणारे नसल्यामुळे या गायी दूध उत्पादनासाठी गरजवंत शेतकऱ्यांना नि:शुल्क दिल्या जात आहेत. त्यासाठी काही अटीही टाकल्या आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सदर फ्रिजवाल गायी आणण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स प्रोड्युसर या कंपनीने प्रस्ताव सादर केला.
ठळक मुद्देगोंडवाना ब्रँड बेपत्ता : शेतकऱ्यांची कंपनी दाखवत शासनाची दिशाभूल?