गडचिराेली : शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या सर्वच बालकांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात माेफत दाेन गणवेशांचा लाभ केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत दिला जाणार आहे, यासंदर्भात शासनाने नुकताच निर्णय घेतला. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे शाळांचे लक्ष लागले असले तरी जुन्या नियमानुसार गडचिराेली जिल्ह्यात ६५ हजार ६९२ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे.नवीन नियमात काेणता झाला बदल?केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच निर्देशाप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीमधील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील मुले यांना दोन गणवेशांचा लाभ दरवर्षी दिला जात हाेता; परंतु नवीन २०२३- २४ या शैक्षणिक सत्रात जि.प.च्या सर्वच शाळांमधील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील माेफत गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे.
गणवेश राहणार एक रंगाचाकेंद्र शासनाच्या योजनेंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी एका गणवेशाचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येईल. तर उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासनामार्फत या शैक्षणिक वर्षात देण्यात येईल. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत यापुढे राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश दिला जाणार आहे.
... तर वाढणार लाभार्थींची संख्याकेंद्र शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच मुला-मुलींना माेफत गणवेशाचा लाभ देण्याबाबत जाहीर केले आहे. त्यानुसार जर दारिद्र्यरेषेवरील मुलांना गणवेशाचा लाभ दिल्यास विद्यार्थी लाभार्थींची संख्या वाढेल. शासनाने निर्णय घेतला असला तरी याबाबत अद्याप जिल्हा परिषदेला सूचना मिळाल्या नाहीत. विशेष म्हणजे, नवीन शैक्षणिक सत्र सुरू हाेण्यास १ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे.