आॅनलाईन लोकमतएटापल्ली : पेसा कायदा व वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामसभांना त्यांचे अधिकार पूर्णपणे प्रदान करावे, त्यामध्ये वन विभाग किंवा इतर प्रशासकीय विभागांनी हस्तक्षेप करू नये, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बांधवांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, लालसु नागोटी, संजय चरडुके व एटापल्ली नगर पंचायतीचे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी सोमवारी धडक दिली.एटापल्ली तालुक्यातील सुरजागड इलक्यातील प्रस्तावित व मंजूर झालेल्या सर्व खदानी बंद कराव्या, स्थानिक नागरिक विरोध करीत असतानाही पुन्हा सुरजागडच्या पहाडीवर गोपानी या कंपनीला नवीन खदाणीची मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अगोदर सुध्दा ग्रामस्थांनी कायदेशीरित्या आपला विरोध प्रदर्शीत केला आहे. त्यानुसार ग्रामसभांचा विरोध असल्यास मान्यता देऊ नये. प्रलंबित असलेले सामुहिक व वैयक्तिक वनहक्क दावे त्वरीत निकाली काढावे, खाणी असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या क्षेत्रातील ग्रामसभांची सामुहिक वनहक्काचे दावे ग्रामसभांनी मंजूर केलेल्या क्षेत्राप्रमाणे मंजूर करावे, सामुहिक वनहक्क ग्रामसभांचे सुधारीत अधिकार जोडपत्र ३ त्वरीत मिळण्यात यावे, पोलिसी दमनावर तत्काळ आळा घालण्यात यावा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील मागील कित्येक वर्षांपासून नोकरी करीत असलेल्या नर्स, एमपीडब्ल्यू, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, वनरक्षक, वनपाल यांच्या बदल्या कराव्या आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.वन विभागाच्या तपासणी नाक्यापासून मुख्य मार्गाने दीड किमी अंतरावर असलेल्या उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. एसडीओ चोरमारे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात दसरू गोटा, गिल्लु नरोटी, कैलाश एका, करीमन तिरकी, शुभांगी गोटा, सविता नरोटी, चैतु कोवासी, बिबी गोटा आदींनी सहभाग घेतला होता.
पेसा अंमलबजावणीसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:35 PM
पेसा कायदा व वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामसभांना त्यांचे अधिकार पूर्णपणे प्रदान करावे,....
ठळक मुद्देएटापल्लीत आंदोलन : सुरजागड पहाडीवरील प्रस्तावित खाणीला तीव्र विरोध