अहेरी : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांची समाज कंटकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेला २० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटत आहे. मात्र या हत्याकांडाच्या प्रमुख आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केली नाही. पोलिसांच्या परिणामशून्य कारवाईमुळे आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यामुळे दलित कुटुंबियांना संपविणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर अनेक संघटनांनी शेकडोच्या संख्येने सोमवारी धडक मोर्चा काढला व आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना एसटीओमार्फत दिलेल्या निवेदनातून केली. जवखेडा गावातील दलित कुटुंबाच्या तीन सदस्यांचा निर्घृण खून करून त्यांना अमानुषपणे विहिरीत फेकून देण्यात आले. मानवी जीवनाला काळिमा फासणारी सदर घटना आहे. या घटनेचा महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी मार्चा, आंदोलन, करून निषेध नोंदविला व प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. राज्यात सदर घटनेविषयी असंतोष वाढत असतांनाही पोलिसांना आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडे गावाला भेट देऊन केवळ कुटुंबियांना आधार देण्याचा काम केला. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत शासनाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ठामपणे मागणी लावून धरली नाही. त्यामुळे आरोपींना त्वरित पकडून मृत्यूदंडाची शिक्षा करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून आंदोलनकर्त्यांनी केली आहे. निवेदन देतांना ज्ञान प्रसारक युवक मंडळ अहेरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली, प्रबुद्ध समाज संघ बुद्ध विहार नागेपल्ली, बहुउद्देशीय विकास संस्था आलापल्ली, रमाई महिला मंडळ आलापल्ली आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
एसडीओ कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: November 17, 2014 10:54 PM