पाणीपुरवठा योजनांची कामे थंड बस्त्यात
कुरखेडा : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र मध्यंतरी निधीच मिळाला नसल्याने अनेक योजनांचे काम बंद पडले आहे, तर काही काम कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे थांबले आहे. काही दिवसांतच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या योजनांची कामे त्वरित मार्गी लावावी.
बसस्थानक परिसरात टॅक्सींचे अतिक्रमण
धानोरा : गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव मार्गावर सध्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. धानोराचे बस स्टँड रस्त्यालगतच आहे. स्वतंत्र जागा नसल्याने काळीपिवळी टॅक्सी व इतर खासगी बसेस या ठिकाणी अतिक्रमण करून दररोज अनेक प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
भामरागड : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
कार्यालयांमधील थम मशीन सुरू करा
काेरची : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील थम मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे थम मशीन तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
निस्तार डेपो देण्याची मागणी
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावात त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी होत आहे. चामोर्शी भागातील नगारिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी इतर ठिकाणाहून लाकडे आणावी लागत आहेत.
प्रसूतिगृह निर्मितीचे बांधकाम रखडले
एटापल्ली : तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र यातील काही उपकेंद्रांतील प्रसूतिगृहांचे बांधकाम रखडले आहे. संस्थेअंतर्गत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सदर बांधकाम होणे गरजेचे आहे.
जारावंडी-एटापल्ली मार्गाचे रुंदीकरण करा
एटापल्ली : जारावंडी परिसरातील रस्त्यांचा विकास शासनाच्या दुर्लक्षामुळे खुंटला आहे. जारावंडी- एटापल्ली रस्ता अरुंद असल्याने येथे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे. परिसरात अनेक समस्यांची भरमार आहे. यात जारावंडी, सरखेडा ते राज्य सीमा रस्त्यावरील बांडिया नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरमोरी मार्गावर गतिरोधक निर्माण करा
गडचिरोली : गडचिरोली - आरमोरी या मुख्य मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर शहरात बसथांबा, व्यावसायिक दुकाने व शाळा असल्याने येथून विद्यार्थी व नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे मार्गावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात, मात्र त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत.
अनेक कुटुंबांकडून शौचालयांचा गैरवापर
भामरागड : अनेक गावांत शौचालयात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक भरून ठेवतात. त्यामुळे त्याचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, शौचालयाचा वापर होत नसल्याने गावात अस्वच्छता पसरत आहे.
वाहतूक नियमांना तिलांजली
कुरखेडा : दुचाकीवर तीन व्यक्ती बसून वाहन चालवीत असल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे. बालकांपासून जबाबदार नागरिकांपर्यंत सर्रास वाहतुकीचे नियम तोडून ट्रिपल सीट जात असतानाचे दृश्य नेहमीच पाहावयास मिळते.
शाळेच्या आवारातील विद्युततारा हटवा
आरमाेरी : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युततारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युततारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये, याकरिता तारा हटवाव्यात.
कोरची तालुक्यातील रस्ते दुरुस्त करा
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले असून, अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.