एटापल्लीत मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचा आरोपएटापल्ली : एकात्मिक बाल विकास योजना सुरू होऊन ४० वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. या कालावधीत बाल विकास प्रकल्पाच्या संख्येत कित्येकपटीने वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत निधीत वाढ झाली नसल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. अंगणवाडी महिलांचा मेळावा एटापल्ली येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुमन गावळे होत्या. मेळाव्या दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. पुढे मार्गदर्शन करताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की, २ आॅक्टोबर १९७५ रोजी देशातील केवळ ३७ प्रकल्पात ही योजना सुरू झाली. सद्यस्थितीत राज्यात ५५३ प्रकल्प व देशात ७ हजार ६३ प्रकल्पात बाल विकास योजना सुरू असून १३ लाख ५० हजार अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या योजनेच्या खर्चामध्ये केंद्र शासनाने प्रचंड कपात केली आहे. २०१३-१४ च्या बजेटमध्ये २७ हजार करोड रूपयांची तरतूद केली होती. ती आता २०१५-१६ मध्ये ८ हजार रूपयांवर आणली आहे. याचाच अर्थ बाल विकास योजना गुंडाळण्याच्या दृष्टीने केंद्र शासन प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. एटापल्ली प्रकल्पात अंगणवाडी मदतनिसांच्या ४२ जागा दोन वर्षांपासून रिक्त आहेत, असाही आरोप दहिवडे यांनी केला. मेळावा यशस्वी करण्यासाठी उमा मेडीवार, तारा वैरागडे, गुलशन शेख, अनुसया झाडे, कविता मुलमुले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
बाल विकास प्रकल्प वाढले मात्र निधी घटला
By admin | Published: October 18, 2015 1:41 AM