अशोक नेते यांची माहिती : गडचिरोली पालिकेला ९५ कोटी प्राप्तलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेला आपण पुढाकार घेऊन शासनाकडून ९५ कोटी रूपयाचा निधी खेचून आणला आहे. याशिवाय २५ कोटी हे राज्य सरकार विशेष निधी म्हणून गडचिरोली पालिकेला देणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी दिली. स्थानिक शासकीय विश्रामगृहात खासदार अशोक नेते यांनी भाजपचे पालिकेतील पदाधिकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, शासनाच्या सदर निधीतून गडचिरोली शहराच्या कानाकोपऱ्यात रस्ते, नाली व विविध विकास कामे होणार आहेत. या पलिकडेही मोठी विकास कामे करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारकडून भरघोस निधी मिळवून देणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी अनिल कुथे, विश्रोजवार, वाघरे, प्रकाश गेडाम, गुलाब मडावी, मुक्तेश्वर काटवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व पालिकेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निधी मिळाल्याने विकास होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 12:44 AM