योजना राबविताना अडचण : यंदा ३ कोटी ५२ लाख रूपये कमी मिळालेगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला मानव विकास मिशन अंतर्गत १० कोटी २४ लाख ३२ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सदर निधी ३ कोटी ५२ लाख ४७ हजार रूपयांनी कमी आहे. ज्या जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक अत्यंत कमी आहे. अशा जिल्ह्यांमध्ये मानव विकास मिशनच्या योजना राबविल्या जातात. मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्याला १३ कोटी ७६ लाख ७९ हजार ४९४ रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. सदर निधीचे नियोजन करून विविध विभागांना वितरित करण्यात आला. वाढत्या महागाईनुसार २०१५-१६ साठी वाढीव निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र शासनाने अपेक्षा भंग करीत मागीलवर्षीपेक्षाही कमी म्हणजेच १० कोटी २४ लाख ३२ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे या निधीचे व्यवस्थित नियोजन करतानाही प्रशासनाची दमछाक उडत आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासापासून दूर असलेल्या भागासाठी योजना राबविली जात असल्याने किमान या योजनेवर तरी कात्री लावायला नको होती, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)मागील वर्षी विविध योजनांवर झालेला १३ कोटी ७६ लाखांचा खर्चमाध्यमिक शाळांमध्ये सोलर लाईट लावणे, फर्निचरची दुरूस्ती करणे व विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी १९ लाख ४० हजार रूपये, गरजू मुलींना ९६ लाख रूपयांच्या सायकली, तालुक्याच्या ठिकाणी बालभवन निर्मितीसाठी १ लाख १० हजार रूपये, कस्तुरबा गांधी बालिका योजनेसाठी ५३ लाख ५० हजार, गर्भवती महिलांची तसेच बालकांची तपासणी व औषधोपचारासाठी ९७ लाख ९२ हजार, बुडीत मजुरीसाठी १ कोटी २ लाख ८ हजार, आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी ६ कोटी ७६ लाख, कृषी गटांना आटाचक्की वाटपासाठी ९० लाख ४८ हजार व निवडक शेतकऱ्यांच्या बचतगटासाठी यंत्र उपलब्ध करण्यासाठी २ कोटी ३९ लाख रूपये खर्च करण्यात आले.
मानव विकास मिशनच्या निधीला कात्री
By admin | Published: September 28, 2015 1:36 AM