आलापल्ली : आलापल्ली वन परिक्षेत्रातील मरण पावलेल्या जयजक्षी हत्तिणीवर मंगळवारी दुपारी १२.३० वाजता पातानीलच्या जंगलात मोक्कास्थळी शवविच्छेदन करण्यात आला. त्यानंतर जंगलातील एका उंच जागेवर जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आलापल्लीपासून १५ किमी अंतरावर पातानील हत्तीकॅम्प परिसरात लाकूड ओढणीच्या कामासाठी असलेल्या जयजक्षी या मादी हत्तिणीचे निधन झाले. जयजक्षीवर शवविच्छेदन करण्यासाठी मुख्य अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या कार्यालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा राऊत, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवी खोब्रागडे हे मंगळवारी आलापल्ली येथे आले होते. त्यांच्या समावेत वन विभागाचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) के. डी. कोवे, आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी आर. एम. अग्रवाल, वन परिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार आदी उपस्थित होते. मृतक हत्तिणीचे महत्त्वाचे अवयव सुक्ष्मजीव तपासणीकरिता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.सदर जयजक्षी नावाची हत्तीण सर्वात वयोवृध्द होती. ती काही दिवसापूर्वीच सेवानिवृत्त झाली. तिच्याकडून कसल्याही प्रकारचे काम करून घेतल्या जात नव्हते. हत्ती कॅम्पपासून अर्धा किमी अंतरावर जयजक्षी आणि जयलक्ष्मी या हत्तिणीची लढाई झाली. यात जयजक्षी नाल्यात पडून मरण पावली. मंगळवारी तिचा मृतदेह नाल्यातून जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करीत असताना तिचे पोट फुटल्याने नाल्यातच शवविच्छेदन करण्यात आले व तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात वन परिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार म्हणाले की, जयजक्षीचे निधन नेमके कशाने झाले हे अहवालानंतर कळेल. तिचे वन विभागासाठी भरीव योगदान होते, असे ते म्हणाले. (वार्ताहर)
पातानील नाल्यात ‘जयजक्षी’वर अंतिम संस्कार
By admin | Published: September 30, 2015 2:15 AM