कोरची : आई-वडिलांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार मुलाच्याच हातून करण्याची परंपरा आहे. पण मुलगा नसणाऱ्यांनी काय करायचे? अशीच स्थिती ओढवलेल्या एका आईवर तिच्या पाच मुलींनीच खांदा देण्यापासून ते अग्निसंस्कार करण्यापर्यंत सर्व सोपस्कार पार पाडत, मुलगा-मुलगी असा भेद न ठेवता सर्वांना समान अधिकार असल्याचा संदेश दिला.
येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच प्रतिष्ठित नागरिक अण्णाजी रामचंद्र पाकलवार यांच्या पत्नी निर्मला (६० वर्षे) यांचे गेल्या आठवड्यात पहाटे ४ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती (अण्णाजी) आणि पाच मुली, चार जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. पाचही मुली आईच्या लाडक्या होत्या. त्यापैकी चार मुलींचा विवाह होऊन त्या आपापल्या संसाराला लागल्या आहेत. पण आईच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांना दु:ख अनावर झाले. आपल्याला भाऊ नसला तरी आई-वडिलांना मुलाची कमतरता भासू नये, म्हणून त्यांनी, आईवर आम्हीच अंत्यसंस्कार करणार, असे ठरविले. घरून अंत्ययात्रा निघाली, त्यावेळी पार्थिवाला खांदा देण्यापासून ते कोचीनारा घाटावर चितेला अग्नि देण्याचेही काम मुलींनीच केले.
निर्मला पाकलवार यांच्या चार मुलींचा विवाह झाला असून सर्वात लहान मुलगी भावना ही अविवाहित आहे. मोठी मुलगी संगीता हेमराज गेडे ही चंद्रपूरला, दुसरी मुलगी वर्षा (जिया) नसरुद्दीन भामानी कोरचीत, तिसरी तनुजा विशाल जवणे ही आलापल्लीत, तर चौथी मुलगी माधुरी राहुल मेश्राम ही कुरखेडा येथे राहते. या मुलींसह सर्व जावई यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे सेवानिवृत्त अण्णाजी पाकलवार यांचा शिक्षकी पेशातील कार्यकाळ कोरची तालुक्यातील आदिवासीबहुल ग्रामीण क्षेत्रात गेला आहे. परिसरात आदर्श शिक्षक अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी नेहमीच पुरोगामी विचारसरणी अवलंबत, तसे संस्कार मुलांवर केले. त्यामुळेच त्यांच्या मुलींनी वडिलांना मुलाची कमतरता भासू न देता सर्व कर्तव्य पार पाडले.
(बॉक्स)
- अन् बाथरूममध्येच त्या कोसळल्या
मागील दोन ते तीन दिवसांपासून निर्मला पाकलवार यांची प्रकृती खराब होती. चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन त्या घरी परतल्या होत्या. ही घटना घडली तेव्हा घरात लहान मुलगी भावना आणि तिचे वडील अण्णाजी हे होते. रात्रीला उठायचे झाल्यास निर्मला या लहान मुलीची किंवा पतीची मदत घेऊन बाथरूमला जायच्या. परंतु त्या दिवशी रात्री कुणालाच आवाज न देता त्या उठून बाथरूमला गेल्या. दुर्दैवाने तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्या बाथरूममध्येच पडल्या.
लहान मुलीला जेव्हा आई बेडवर दिसली नाही, तेव्हा तिने कानोसा घेतला असता, बाथरूमचे नळ सुरू असल्याचा आवाज आला. आई बाथरूमला गेली असावी, येईलच असे तिला वाटले. पण खूप उशीर झाल्यावरही आई बेडवर आली नाही, म्हणून मुलीने जाऊन पाहिले असता, आई बाथरूममध्ये पडून असल्याचे दिसले. तिला पहाटेच ४.३० वाजता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नेले असता, डॉ. राहुल राऊत यांनी तपासून मृत घोषित केले.