सकाळी ७.३० वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती; परंतु ३ वाजताही अनेक मतदार रांगेत असल्यामुळे मतदान केंद्राच्या आवारातील मतदारांना आत घेऊन कंपाउंडचे फाटक बंद करण्यात आले. त्यांचे मतदान होण्यासाठी ५ वाजले.
(बॉक्स)
घरासमोरच्या मोकळ्या जागेत केंद्र
एटापल्ली तालुक्यातील उडेरा या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गावात सुरक्षेच्या कारणावरून मतदान केंद्र एका घराच्या आवारात ठेवण्यात आले. घराच्या अंगणातच मतदानाची सर्व व्यवस्था करून देण्यात आली होती. त्या ठिकाणी जाऊन मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला.
एटापल्ली तालुक्यात अनेक केंद्रांत बदल
एटापल्ली तालुक्यात १४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होते. एटापल्लीतील लोकमत प्रतिनिधीने गुरुपल्ली, तुमरगुंडा, उडेरा, येमली, बुर्गी, कांढोळी, पुरसलगोंदी आदी ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांना भेट दिली. अनेक ठिकाणी मतदान केंद्र हलविल्याचे दिसून आले. ज्या गावात निवडणूक त्याच गावात मतदान केंद्र नव्हते. त्यामुळे मतदारांना १० ते १२ किलोमीटरची पायपीट करत किंवा मिळेल त्या वाहनाने मतदानासाठी जावे लागले. उडेरा येथील केंद्राची जागा सुरक्षेच्या कारणावरून बदलली. येमली येथे वेळेवर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत केंद्र हलविण्यात आले. त्या केंद्रावर पत्रकारांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पारदर्शक वातावरणात मतदान सुरू आहे का, याबद्दल काहींनी शंका घेतली.
पुरसलगोंदचे मतदान केंद्र नेहमी गावातच असते. यावेळी ते प्रथमच हेडरी गावात ठेवण्यात आले. त्यामुळे १२ गावांतील मतदारांनी ५ ते ८ किमी पायी जाऊन तिथे मतदान केले. २१३१ मतदार असल्याने तिथे मोठी गर्दी झाली होती.
तालुकानिहाय मतदानाची अंदाजित टक्केवारी
तालुका मतदान
एटापल्ली ६४.९५ टक्के
सिरोंचा ७९.०९ टक्के
मुलचेरा ८०.१२ टक्के
भामरागड ५३.७९ टक्के
अहेरी - अप्राप्त
चामोर्शी - अप्राप्त