दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली शहरातील प्रत्येक नळाला पाणी माेजमाप करणारे मीटर लावले जाणार आहे. याची निविदा काढण्यात आली असून महिनाभरात प्रत्यक्ष मीटर लावण्याच्या कामाला सुरुवात हाेणार आहे. जेवढा पाणी वापर तेवढे पैसे माेजावे लागणार असल्याने पाण्याची बचत हाेण्यास फार माेठी मदत हाेणार आहे. गडचिराेली शहरातील नळांना पाणी माेजमाप मीटर लावण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून नगर परिषदेमार्फत प्रयत्न केले जात हाेते. मात्र निधी नसल्याने हा प्लान पुढे ढकलला जात हाेता. अखेर नगर परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नगराेत्थान याेजनेतून तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून शहरात आता नळांना मीटर लावले जाणार आहेत. २ काेटी ९१ लाख ३३ हजार ३१० रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. नागपूर येथील वाॅटरसी साेल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम मिळाले आहे. विशेष सभेत निविदेला मंजुरी मिळाल्याने कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जाऊन महिनाभरात कामाला सुरुवात हाेणार आहे.
बालटीभर पाण्यासाठी माेजावे लागणार २० पैसे
राज्यातील बहुतांश माेठ्या शहरांमध्ये नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. यात आता गडचिराेली शहराचाही समावेश हाेणार आहे. ज्या शहरांमध्ये मीटर लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रती लिटर १ पैसा शुल्क आकारले जात आहे. जवळपास तेवढाच दर गडचिराेली शहरातही आकारला जाण्याची शक्यता आहे. एक बकेट जवळपास २० लिटरची राहते. तेवढे पाणी नळातून घेतल्यास २० पैसे बिलात जाेडले जाणार आहेत.
- आता वर्षाला सरसकट प्रती जाेडणी दीड हजार रुपये आकारले जात आहेत. यापुढे लाईट बिलाप्रमाणचे रीडिंग करून बिल आकारले जाईल. यात तीन, चार किंवा सहा महिन्यांनी बिल आकारले जाईल. - बांधकाम किंवा अवैध कामासाठी पाण्याचा वापर हाेत असल्यास नगर परिषद दंड म्हणून संबंधित पाण्याचा दर त्या ग्राहकासाठी वाढवू शकते.
बिलाच्या भीतीने नळांना लागणार आपाेआप ताेट्यानगर परिषदेने अनेकवेळा कारवाई करूनही नळधारक नळांना ताेट्या लावत नव्हते. त्यामुळे हजाराे लिटर पाणी वाया जात हाेते. पाणी कितीही वापरा बिल तेवढेच असल्याने नळधारक ताेट्या लावण्याकडे दुर्लक्ष करीत हाेते. आता मात्र ताेट्या लावल्याशिवाय पर्याय नाही.
अनेक नळधारक दुसऱ्या मजल्यावर पाणी चढविण्यासाठी टिल्लू पंप लावत हाेते. आता टिल्लूपंपाचा वापर बंद हाेईल. एखादा व्यक्ती टिल्लूपंप लावत असेल तर त्याला पाण्याच्या वापरएवढे बिल द्यावे लागणार आहे.
जे नागरिक पाण्याचा वापर कमी करतील त्यांना मात्र कमी बिल येऊन त्यांच्या पैशांची बचत हाेईल. जे नागरिक पाण्याचा अपव्यय करतील, त्यांना अधिकचे बिल भरावे लागणार आहे.