लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी जानेवारी ते जुलै या ७ महिन्याच्या कालावधीत रस्ते अपघातात गडचिरोली जिल्ह्यात ६३ जणांनी प्राण गमावले. त्यातील ३७ मृत्यू हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्या सर्वांनी हेल्मेट घातलेले नव्हते हे विशेष. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचलेही असते. मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा मुद्दा गांभिर्याने घेत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करा, असे निर्देश दिले.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अपघातांविषयी आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जानेवारीपासून जुलैपर्यंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेण्यात आली. त्या अपघातांमध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत.मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांपैकी कोणत्याही व्यक्तीने डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. यापुढे दुचाकीस्वारांचे अपघात झाल्यास प्राणहाणी टाळता यावी म्हणून प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करण्याबाबत प्रक्रिया राबवा, त्यासाठी जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक व पोलीस विभागाला दिल्या.हेल्मेटसक्ती करताना सुरूवातीला एक महिना वाहनधारकांची जनजागृती केली जाईल. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे, गडचिरोली वाहतूक शाखेच्या प्रभारी पुनम गोरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.जयंत पर्वते आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) गोरख गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामीण रस्त्यांवर सर्वाधिक अपघातजास्त वेगाने दुचाकी चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे ही या अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले. यापुढे प्रत्येक अपघाताचे सूक्ष्म विश्लेषण करून अहवाल तयार करावा, जेणेकरून त्यावरून ब्लॅक स्पॉट (वारंवार अपाघाताचे ठिकाण) ठरविण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविले. तसेच अपघातांच्या विश्लेषणावरून नेमक्या चुका कोणत्या आहेत व त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास करणे सोपे होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.