२०० बसफेऱ्या झाल्या रद्द : नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाचा परिणाम गडचिरोली : माओवादी संघटनांच्या शहीद सप्ताहादरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला नक्षल्यांकडून नुकसान पोहोचविल्या जाते. नुकसान टाळण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गडचिरोली आगाराने नक्षल सप्ताहादरम्यान दुर्गम भागातील जवळपास २०० बसफेऱ्या रद्द केल्या होत्या. यामुळे गडचिरोली आगाराला सात लाखांचा फटका बसला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. माओवादी संघटनांच्या वतीने दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पाळण्यात येतो. दरम्यान नक्षली गावागावात तसेच अनेक ठिकाणी बॅनर व पत्रके टाकून शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन जनतेला करीत असतात. शहीद सप्ताहादरम्यान नागरिकांनी सर्व कामे बंद ठेवावी, असे आवाहनही माओवादी संघटनांतर्फे केले जाते. गडचिरोली आगारातून दुर्गम भागात पोहोचलेल्या बसेसना नक्षल्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर गडचिरोली आगाराने नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान नक्षल प्रभावीत क्षेत्रातील गोडलवाही, कारवाफा, पेंढरी, मालेवाडा, मुरूमगाव व इतर भागात जाणाऱ्या जवळपास २०० बसफेऱ्या रद्द केल्या. यामुळे गडचिरोली आगाराचे ६ लाख ८८ हजार २९२ रूपयांचे नुकसान झाले. (स्थानिक प्रतिनिधी)३१ हजार किमी अंतरावर बसला ब्रेकमाओवादी संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान पुकारण्यात आलेल्या नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान गडचिरोली आगाराच्या बसेस ३१ हजार ४५८ किमी अंतर पार करू शकल्या नाहीत. अनेक बसेस अर्ध्या अंतरावरच पोहोचून आगारात परत येत होत्या. त्यामुळे आगाराला ६ लाख ८८ हजार २९२ रूपयांचे नुकसान सहन करावा लागला असल्याची माहिती बसस्थानक प्रमुख सुभाष राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.
गडचिरोली आगाराला सात लाखांचा फटका
By admin | Published: August 08, 2015 1:36 AM