प्रमुख चारही मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे : वाहनधारकांना त्रास; वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवरगडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चामोर्शी, मूल, धानोरा व आरमोरी या चारही प्रमुख मार्गावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या प्रमुख मार्गाची पक्की दुरूस्ती करण्यात न आल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.चामोर्शी, आरमोरी, धानोरा, मूल या प्रमुख मार्गावर दिवसा व रात्री वाहनांची मोठी वर्दळ असते. गडचिरोली शहरातून इतरत्र शहराबाहेर जाण्यासाठी येथील इंदिरा गांधी चौकातून याच मार्गाने जावे लागते. शहरात बायपास मार्गाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे या चार प्रमुख मार्गावर ओव्हरलोड वाहतुकीचाही भार आहे. गडचिरोली शहरातून राजनांदगाव, अहेरी व चंद्रपूरकडे दररोज ओव्हरलोड वाहतूक याच मार्गावरून होत असते. क्षमतेपेक्षा अधिक माल मोठ्या वाहनाद्वारे वाहून नेला जातो. त्यामुळे शहरातील चारही प्रमुख मार्गाची दुरवस्था झाली आहे.मूल मार्गावर इंदिरा गांधी चौकापासून कॉम्प्लेक्स भागातील जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत डांबरीकरण उखडले आहे. झटके खात या मार्गाने वाहनातून प्रवास करावा लागतो. रात्री या मार्गावर अंधार राहत असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविता येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. डांबरीकरणाला सिमेंट काँक्रिटची जोड धानोरा, चामोर्शी, मूल व आरमोरी हे चारही प्रमुख डांबरी मार्ग आहेत. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी पक्के डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र आद्रा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे चामोर्शी, मूल व आरमोरी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले. लोकांची ओरड लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या दुरूस्तीस प्रारंभ केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या डांबरी मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजविल्या जात आहेत. शाळकरी विद्यार्थीही हैराणमूल, चामोर्शी, धानोरा मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. शहरातील मुल-मुली सायकलने याच मार्गावरून शाळा, महाविद्यालयात ये-जा करीत असतात. मात्र प्रमुख डांबरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या सायकली व दुचाकीला अपघात घडत आहे. मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थीही कमालीचे त्रस्त झाले आहेत.
गडचिरोली शहर सापडले खड्ड्यात
By admin | Published: July 06, 2016 1:48 AM