लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गडचिरोलीतील व्यापारी वर्ग व लोकप्रतिनिधींनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील संपूर्ण बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद होती. केवळ औषधी दुकाने, पेट्रोल पंप, बँका आणि सरकारी कार्यालये वगळता बहुतांश व्यवहार बंदच होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जनता कर्फ्यूमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.
शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर सकाळपासून वर्र्दळ नव्हती. केवळ सरकारी कर्मचारी कार्यालयात जाताना दिसत होते. बँकांमधील गर्दीही नेहमीप्रमाणे नव्हते. बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील काही कर्मचारीही कोरोनाबधित झाल्याने ही शाखा दोन दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना गोंडवाना विद्यापीठातील शाखेत धाव घ्यावी लागली. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आ.डॉ.देवराव होळी व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काही भागात फिरून परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आतापर्यंत १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. अजून १७ जणांना तीव्र स्वरूपात लक्षणे असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या वर गेला आहे. दैनंदिन स्वरूपातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी जनता कर्फ्यू आणि नियमांचे पालन करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याची भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरी आलेल्या पथकाला सहकार्य करून आरोग्यविषयक माहिती द्या, तसेच त्यांना तपासणीस सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले.
सूचनांचे पालन करागरज असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून दिलेल्या सूचनांचे पालन करा. यामध्ये मास्क लावणे, शारीरिक आंतर राखणे, कोरोनाची लक्षणे असल्यास आरोग्य विभागाला संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांच्या सहभागाशिवाय संसर्ग रोखणे शक्य नाही. त्याकरिता प्रत्येकाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी केले.
आरमोरी-कोरचीतही जनता कर्फ्यूच्या हालचालीगडचिरोलीपाठोपाठ आरमोरी आणि कोरची येथेही जनता कर्फ्यू पाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात सर्वपक्षीय नेते आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासंदर्भात बैठकही झाली असून हा जनता कर्फ्यू कधी सुरू करायचा, कशा पद्धतीने पाळायचा यावर चर्चा झाली. दरम्यान आरमोरी नगर परिषद कार्यालयातील चार कर्मचारी एक कंत्राटदार पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. नगर परिषद कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरची येथे बुधवारी तहसीलदार, नायब तहसीलदार, नगर पंचायत कर्मचारी, व्यापारी व गावकऱ्यांची बैठक बाजार चौकातील हनुमान मंदिरात झाली. त्यात २६ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ ऑक्टोबरपर्यंत हा कर्फ्यू ठेवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी नागरिकांना नियमांचे पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाई करावी लागेल, अशी तंबी दिली.