गडचिरोली : मलेरियाचे राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीही ही स्थिती कायम आहे. किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा ही यावर्षी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे. आरोग्य विभागाकडून मलेरियाला नियंत्रित ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात, मात्र स्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश येताना दिसत नाही.
जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे १९७६ रुग्ण आढळले आहेत. त्यातून ३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी याच काळात १११० रुग्ण आढळले होते. त्यावरून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मलेरियाचा प्रकोप जास्त असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या ४ महिन्यांत मलेरियाचा उद्रेक सर्वाधिक होतो. गेल्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार ३२६ रुग्ण मलेरियाग्रस्त होऊन त्यातील ८ रुग्ण दगावले होते.
फेब्रुवारी आणि मार्च २०२२ या दोन महिन्यांत ६५९ संवेदनशील गावांमध्ये हिवताप सर्वेक्षण मोहीम राबवून प्रत्येक कुटुंबातून रक्त नमुने घेऊन तपासले. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्या यावर्षी जास्त दिसत असल्याचे हिवताप नियंत्रण विभागाने स्पष्ट केले.
दोन लाख मच्छरदाण्यांचे वाटप
डासांपासून मलेरिया पसरत असल्यामुळे डासांना दूर ठेवण्यासाठी गेल्या वर्षी (२०२१) तब्बल ५९४ गावांमध्ये १ लाख ९७ हजार ४८० मच्छरदाण्यांचे निशुल्क वाटप करण्यात आले, पण त्यांचा वापर झोपताना डासांपासून संरक्षण करण्यासाठी न करता अनेक लोक मासे पकडण्यासाठी करतात. याशिवाय दुर्गम भागातील लोक अंगावर कमी कपडे ठेवतात. त्यामुळे दिवसाही त्यांना डासांचा दंश होऊन मलेरियाचे जंतू त्यांच्या अंगात पसरतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
भामरागड तालुका राज्यात अग्रेसर
मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या तालुक्यांत भामरागड तालुक्याचा राज्यात पहिला क्रमांक लागतो. या तालुक्यात गेल्या चार महिन्यांत ११४४ रुग्ण आढळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या तुलनेत या तालुक्यात मलेरियाचे प्रमाण ५७ टक्के आहे. केवळ साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होते असे नाही तर जंगलातही डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रात ७६ टक्के जंगल आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळतात, झोपडी वजा घरांमुळे डास नाशक फवारणीचा ही फारसा उपयोग होत नाही, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी सांगितले.