गडचिराेली : कोरोनाची तिसरी लाट ओसरताच राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले. त्यात पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याला मात्र वगळण्यात आले.
कोरोना रुग्णांची कमी असतानाही या जिल्ह्यांत निर्बंध सैल करण्यात आलेले नाही, त्याचे कारण हेच आहे. काेराेना लसीकरणाच्या मापदंडानुसार राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात येते. गडचिराेली जिल्ह्यात लसीच्या दाेन्ही डाेसचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे प्रशासनाने महाशिवरात्री जत्रांसाेबतच इतर निर्बंध कायम ठेवल्याने भाविकांची माेठी अडचण हाेत आहे.
मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळत धार्मिक कार्यक्रम व विधी पार पाडला जात आहे. यंदा निर्बंधामुळे येथे केवळ धार्मिक विधी सुरू आहेत; पण काेणतेही मनाेरंजनाची साधने व इतर उपक्रम पूर्णत: बंद आहेत. केवळ पूजाअर्चा करून भाविकांना घराची वाट धरावी लागत आहे. छाेट्या व्यावसायिकांनाही त्यांची दुकाने लावता आली नसल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे कोरोनाच्या लाटेत गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता.