लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटी महामंडळाने जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला सुरूवात होऊन अडीच महिने झाले, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने एसटीच्या अजूनही मोजक्याच फेऱ्या धावत आहेत. त्यामुळे दिवसागणिक एसटीच्या तोट्यात भर पडत आहे. गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
२२ मार्च रोजी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तेव्हापासून ३ मे पर्यंत बससेवा पूर्णपणे बंद होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ४ मे पासून गडचिरोली जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र अजुनही बसला प्रवासी मिळत नसल्याने बहुतांश मार्गांवरील बसफेऱ्या बंदच आहेत. काही मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र त्यांच्यामध्ये केवळ ३० ते ४० टक्के भारमान मिळत आहे. परिणामी एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सोडल्या जात आहेत.
सामान्य परिस्थितीत गडचिरोली, अहेरी आणि ब्रह्मपुरी आगार मिळून एसटीला दरदिवशी ३ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र लॉकडाऊनपासून या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. मार्च महिन्यात ३ कोटी ७ लाख, एप्रिल महिन्यात १० कोटी ५१ लाख, मे महिन्यात ८ कोटी ३४ लाख, जून महिन्यात ७ कोटी ७५ लाख असे एकूण २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र बसेस बंद असल्याने हे उत्पन्न आले नाही.
३ कोटी रुपयांची उधारीगडचिरोली विभागातील ३ आगारांमध्ये महिन्याला १० कोटींचे उत्पन्न बुडत असताना दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च मात्र सुरूच आहे. त्यामुळे एसटीचा तोटा गंभीर स्वरूप धारण करीत आहे. ३ कोटी १० लाख रुपयांची उधारी शिल्लक आहे. यामध्ये डिझेलचे ६१ लाख, एलआयसीचे २४ लाख, एसटी बँकचे १ कोटी १२ लाख आदींचा समावेश आहे. व्यवहार सुरू होऊन एसटीला प्रवासी मिळेल तेव्हाच परिस्थिती सुधारू शकते.