गडचिरोली - आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. नक्षलविरोधी अभियानादरम्यान जंगलात गस्तीवर असलेले पोलीस जवान मंगळवारी रात्री एका ठिकाणी आराम करीत होते. यावेळी त्यांच्यासोबत एक कुत्राही होता. आराम करीत असलेल्या जवानांच्या डोक्याजवळ एक घोनस हा विषारी साप आल्याचे दिसताच सोबतच्या कुत्र्याने त्याच्या दिशेने पायाने माती ढकलत त्याला जवानांच्या जवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ही बाब जवानांच्या लक्षात येताच त्यांनी उठून पाहीले असता एक विषारी साप तिथे होता. जवान सावध झाल्याचे पाहताच कुत्र्याने सापावर झडप घातली. मात्र त्या झटापटीत सापाने कुत्र्याला चावा घेतला. सापाला मारून पोलीस जवान धानोराच्या दिशेने निघाले असता कुत्र्याला सापाने दंश केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कुत्र्याला लागलीच लगतच्या गावात जाऊन गावठी इलाज करण्याचा प्रयत्न जवानांनी केला, मात्र त्यात यश आले नाही. विषाचा अंमल झाल्याने त्या कुत्र्याने प्राण सोडला. आपला प्राण देऊन जवानांना वाचविणाºया त्या कुत्र्याला बुधवारी सकाळी समाधी देण्यात आली.
कुत्र्याने स्वत:चा जीव देऊन वाचविले जवानांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 6:52 PM