लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आपल्या नातेवाईकांच्या रोवण्यावर पेढ्या टाकण्यासाठी डोंगरसावंगी येथे गेलेल्या दोन चुलत भावंडांवर शेतात वीज कोसळून झालेल्या घटनेत एक भाऊ जागेतच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची ह्रदय दायक घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली.मृतक बालकाचे नाव यश गेनूदास राऊत वय 16, वर्ष तर गंभीर जखमी बालकाचे नाव मनीष किशोर राऊत 15 वर्ष दोघेही राहणार वडधा अशी नावे आहेत.
कोरोनामुळे शाळेला सुट्या असल्याने वडधा येथील यश आणि मनीष हे दोघे चुलत भाऊ आपला नातेवाईक असलेल्या डोंगरसावंगी येथील ऋषी रोहणकर यांचे शेतावर गेल्या चार पाच दिवसा पासुन इतर महिला मजुरांसमवेत ट्रॅक्टरने वडधा ते डोंगरसावंगी ये जा करीत होते. आज सोमवारला दुपारी दोनच्या सुमारास रोवणीकरीता बांध्यात दोघेही पेढ्या टाकत असताना अचानक विजेच्या कडकडासह पावसाला सुरवात झाली त्यामुळे यश आणि मनीष या चुलत भावाची शेतातील किन्हीच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र काळ जवळ आल्याची पुसटशीही कल्पना ही त्यांना नव्हती.
ज्या झाडात हे दोघे उभे होते त्याच झाडावर वीज कोसळली आणि घटनेत यश हा जागीच ठार झाला तर मनीष हा गंभीर जखमी झाला. त्याला लगेच आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. सदर घटनेने वडधा व डोंगरसावंगी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यश व मनीष हे दोघेही वडधा येथील किसान विद्यालयात शिक्षण घेत होते अशी माहिती आहे.