गडचिरोली: महाराष्ट्रातील नलक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीतपोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांकडून 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सर्वात मोठा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेही मारला गेला आहे. सरकारने मिलिंद तेलतुंबडेवर 50 लाखाचं बक्षीस ठेवलं होतं. मागील अनेक वर्षांपासून पोलिस तेलतुंबडेचा शोध घेत होते. अखेर काल महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 यूनिटने कारवाईत तेलतुंबडेला ठार केलं.
कोण होता मिलिंद तेलतुंबडे ?मिलिंद तेलतुंबडे उर्फ कमांडर M उर्फ दीपक उर्फ सहयाद्री मागील तीन दशकांपासून नक्षल कारवायांमध्ये सहभागी होता. त्याच्या डोक्यावर सरकारनं 50 लाख रुपयांचे बक्षीसह जाहीर केलं होतं. तो मूळ यवतमाळ जिल्ह्यातील वाणी गावातील रहिवासी होता. एका भूमिहीन शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला मिलिंद उच्च उच्चशिक्षित होता. त्याने सुरुवातीच्या काही काळ कार्पोरेट कंपनीत नोकरीही केली. पण, अचानक नक्षल विचारांनी प्रभावित होऊन तो नक्षलवादाकडे वळला. समाजसेवा करायला जातोय सांगून घरातून बाहेर पडला तो परत आलाच नाही.
सेंट्रल कमिटीचा सदस्य होतामिलिंद तेलतुंबडे CPI(Moist) च्या सेंट्रल कमेटीचा सदस्य होता. नक्षलवाद्यांनी 2014 मध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल केले होते. त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदार सांभाळणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेला केंद्रीय समितीत स्थान देण्यात आलं होतं. ही नक्षलवाद्यांची सर्वोच्च समिती मानली जाते. मिलिंद तेलतुंबडे एलगार परिषद प्रकरणात फरार होता. याच प्रकरणात मिलिंद तेलतुंबडेचा भाऊ आनंद तेलतुंबडे यांना अटक झाली होती. 2011 मध्ये मिलिंद तेलतुंबडेच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. सध्या त्या जामीनावर बाहेर आहेत. मिलिंद तेलतुंबडेवर जांभूळखेडा स्फोटाचा आरोप होता.
मिलिंद तेलतुंबडेची भूमिका महत्त्वाची होती
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये MMC गोरिल्ला झोनची सुरुवात मिलिंद तेलतुंबडेने केली होती. मिलिंद तेलतुंबडे MMCचे प्रादेशिक प्रमुख होता. मिलिंद तेलतुंबडेची शहरी भागात नक्षलवादी विचारसरणीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका होती. शहरातील मागास समाजातील तरुणांना नक्षल टोळीत भरती करण्यातही मिलिंद तेलतुंबडेचा महत्त्वाचा वाटा होता. नवीन भरती झालेल्यांना प्रशिक्षित करुन ऑपरेशनची योजना आखून त्यांना अंमलात आणण्याची जबाबदारी मिलिंद तेलतुंबडेवर असायची. गेल्या दशकात मिलिंद तेलतुंबडेनी पोलिसांविरुद्ध अनेक कारवाया केल्या होत्या.
गडचिरोलीत काय घडलं ?गडचिरोली येथे रविवारी सुरक्षा दलांने 26 नक्षलवाद्यांना ठार केले. C-60 युनिटने हे मोठे ऑपरेशन केले. मात्र, नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 4 जवानही जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वास्तविक, छत्तीसगडच्या जंगलातून काही नक्षलवादी गडचिरोलीला जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या कमांडो टीमला मिळाली होती. धानोरा या ग्यारापट्टीच्या जंगली भागात पोलिसांचे पथक शोध मोहीम राबवत असताना ही चकमक झाली. कमांडोना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले, त्यात 26 नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या 26 नक्षलवाद्यांपैकी 20 पुरुष आणि 6 महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांकडून एके-47, इन्सास रायफल आणि एसएलआरसह 29 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.