- संजय तिपालेगडचिरोली - भावनेपेक्षाही कर्तव्य महत्त्वाचे असते, असे म्हणतात. या उक्तीला साजेसे काम शेवटच्या टोकावरील सिरोंचा येथील एका कुटुंबाने केले. लग्नाची वरात कर्नाटकला निघण्यापूर्वी नवरदेवाने कुटुंबासह मतदान केंद्र गाठले व लगीनघाईतही मतदानाचा अधिकार बजावत नंतर बोहल्यावर चढणे पसंत केले.
हरिश शिंदे असे नवरदेवाचे नाव आहे. त्यांचे सिरोंचात पुस्तकांचे दुकान आहे. १९ एप्रिलला कर्नाटकात त्यांचा विवाह होणार आहे. याच दिवशी मतदान असल्याने शिंदे कुटुंबापुढे पेच निर्माण झाला होता. घरात पै-पाहुणे, लग्नाची घाई असतानाही हरिश शिंदे यांनी मतदान करुनच बोहल्यावर चढण्याचे ठरवले. त्यानुसार सकाळी कुटुंबासह वरात कर्नाटकाला निघाली. त्याआधी गाडी ग्रामीण रुग्णालयाजवळील जि.प. हायस्कूल येथील मतदान केंद्राकडे वळविण्यात आली. तेथे महेंदी लावलेल्या हातांच्या बोटांवर शाईचा ठिपका लावून हरिश शिंदे यांच्यासह कुटुंबातील इतर मंडळींनी मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले. त्यानंतर ते कर्नाटकला मार्गस्थ झाले.
गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील अतिसंवेदनशील व माओवादग्रस्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्याचा समावेश आहे. तेलंगणा सीमेवरील शेवटच्या टोकावरील या गावात मतदानाबद्दल लोकांमध्ये असलेले भान यानिमित्ताने समोर आले आहे. शिंदे कुटुंबाने यानिमित्ताने सर्वांपुढे लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान किती महत्त्वाचे आहे, याचा आदर्श कृतीतून दाखवला आहे.