लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी कसनासूर जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या आणखी दोन नक्षल्यांचे मृतदेह बुधवारी इंद्रावती नदीत सापडले. मृतदेहाचा काही भाग मगराने खाल्याचे आढळून आले.कसनासूर चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या ३३ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता दोन चकमकीतील मृतक नक्षल्यांची संख्या एकूण ३९ झाली आहे. रविवारी भामरागड तालुक्यातील ताडगावपासून सात किमी अंतरावरील कसनासूर जंगलात सी-६० व सीआरपीएफ जवानांच्या वतीने नक्षलविरोधी अभियान सुरू असताना झालेल्या चकमकीत अनेक नक्षलवादी ठार झाले होते. पहिल्या दिवशी पोलीस जवानांनी १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत केले.सोमवारी इंद्रावती नदीत आणखी ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. बुधवारी शोधमोहीम राबविली असता, पुन्हा एका महिला नक्षलीचा मृतदेह मिळाला. इंद्रावती नदीत मगराचा वावर असतानाही पोलीस जवानांनी जीवाची बाजी लावून नदीत खोल पाण्यात मृतदेहाची शोधमोहीम राबविली. अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
दोन नक्षलवाद्यांची ओळख पटलीकसनासूर व राजाराम खांदलामध्ये झालेल्या चकमकीत एकूण ३९ नक्षली ठार झाले. यामध्ये पहिल्या दिवशी ११ व दुसऱ्या दिवशी पाच नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात आली. उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आणखी दोन नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १८ नक्षलवाद्यांची ओळख पटली असून उर्वरित २१ नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांतर्फे सुरू आहे.