गडचिरोली : गडचिरोली तालुक्याच्या हद्दीत चंद्रपूर मार्गावर असलेल्या पुलखल गावशिवारातील शेतात एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सदर बिबट्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे विषबाधेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर बिबट्याचा मृतदेह पुलखल गावापासून जवळपास १ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात आढळला. ४ ते ५ दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्यामुळे मृतदेह खराब होण्याच्या मार्गावर होता. हा बिबट ३ ते ४ वर्षे वयाचा असून अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. शिवाय विद्युत शॉकमुळे मृत्यू झाल्याच्या खुणाही आढळल्या नाही. त्यामुळे शवपरिक्षणाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही.कैैलुके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
ज्या ठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळला त्या परिसरात एक पोल्ट्री फार्म आहे. विशेष म्हणजे बिबट्याच्या पोटात कोंबडीचा अंशही आढळला. त्यामुळे सदर बिबट्याने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या खल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रोगाने मरण पावलेली कोंबडी खाल्ली की कोंबडीच्या माध्यमातून बिबट्यावर विषप्रयोग झाला हे शवपरिक्षणातच कळू शकेल. मृत्यृचे कारण अधिक स्पष्ट होण्यासाठी बिबट्याच्या मृतदेहाचे नमुने हैैदराबाद येथील प्रयोगशाळेतही पाठविण्यात आले आहेत.