- गाेपाल लाजूरकर गडचिराेली - कुरखेडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून रानटी हत्तींचा वावर आहे. हत्तींचा कळप दिवसभर जंगलात विश्रांती करून रात्री धानासह रब्बी पिकांची नासधूस करीत आहे. अशातच शनिवार ९ डिसेंबर राेजी मध्यरात्री रानटी हत्तींनी डाेंगरीटाेला गावावर हल्ला करून येथील दाेन लाेकांच्या घराची पाडापाडी केली; परंतु हत्तींचा कळप येत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी जवळच्या धानाेरी गावाच्या दिशेने धूम ठाेकून जीव वाचविला.
कुरखेडा तालुक्याच्या पलसगड परिसरात गेल्या आठ दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर आहे. पलसगट गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगरीटोला गाव परिसरात शनिवारी हत्ती दाखल झाले हाेते. डाेंगरीटाेला हे गाव अगदी जंगलाला लागून आहे. येथे अवघ्या सात घरांची वस्ती आहे. गावातील नागरिक नेहमीप्रमाणे झाेपी गेले असताना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास हत्तींचा कळप अचानक डाेंगरीटाेला गावाच्या दिशेने आला. याची कुणकुण लागताच गावातील सर्व कुटुंबांनी अवघ्या १ किमी अंतरावरील धानाेरी येथे आश्रय घेऊन हत्तींच्या कळपापासून आपला जीव वाचविला. मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हत्तींचा कळप डाेंगरीटाेला येथे हाेता. दिवस उजाडताच कळपाने गावातून काढता पाय घेतला.
दाेन कुटुंबीय झाले बेघररानटी हत्तींनी रवींद्र लक्ष्मण मडावी व लहानू फागू जेंगठे यांचे राहते घर तसेच शेतातील धान पुंजणे उद्ध्वस्त केले. घराची माेडताेड करून घरातील जीवनावश्यक वस्तूंचीही नासधूस केली. यशिवाय नकू मडावी व सनकू मडावी या भावंडाचे धानाचे पुंजणे, सुखदेव मडावी यांच्या उभ्या धान पिकात धुडगूस घातला व जमा केलेल्या धानाचे पुंजणे उपसले. येथीलच श्रीराम कल्लो यांच्या मिरची पिकाची नासधूस केली व धानाचे पुंजणे उपसून फेकले. हाती आलेल्या धान पिकाची नासाडी हत्तींनी केल्याने डाेंगरीटाेला येथील शेतकरी हवालदिल झाले. तसेच दाेन व्यक्तीच्या राहत्या घराची माेडताेड केल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले. दुसऱ्या दिवशी रविवारी घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.