गडचिरोली - नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली.
पोलीस व नक्षलवादी यांच्यादरम्यान झालेल्या चकमकीत सुमारे ४० नक्षलवादी ठार झाले होते. या नक्षलवाद्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी नक्षल सप्ताहाचे आयोजन केले होते. २५ मे हा नक्षल सप्ताहाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी बंद पाळण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले होते. जिल्ह्यातील इतर कोणत्याही भागात नक्षल बंदला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र कोरची येथे संपूर्ण दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. बस व खासगी वाहतूक सुध्दा ठप्प होती. कोरची तालुक्यातील दुर्गम भागातही बंद पाळण्यात आला. कोरची शहरात काही ठिकाणी दुकानांसमोर नक्षल्यांनी बॅनर बांधले होते. भामरागड तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावरील आलापल्ली मार्गावर असलेल्या कुमरगुडा येथील पोच मार्गाच्या खडीकरणाचे काम सुरू होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीदरम्यान सर्व वाहने गावातून नेली जात होती. मात्र रोडरोलर हा गावातच ठेवण्यात येत होता. २४ मे च्या रात्री नक्षल्यांनी या रोडरोलरला आग लावली. यामध्ये रोडरोलरचे नुकसान झाले.