गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी मंगळवारी (22 जानेवारी) तीन जणांची निर्घृण हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातील कोसफुंडी गावाजवळील रस्त्यावर तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळले. एप्रिलमध्ये पोलिसांनी कसनसुर चकमकीत 40 नक्षलवाद्यांना मारल्याचा घटनेचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली. जवळच नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमिटीच्या वतीने एक बॅनर लावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळील कसनासूर गावात काही नक्षलवादी गेले. त्यांनी ग्रामस्थांना शस्त्रांचा धाक दाखवून गावाबाहेर काढले. तसेच पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तीन ग्रामस्थांची निर्घृणपणे हत्या केली. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहेत. छत्तीसगडमधून आलेल्या 100 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी गावातील 6 लोकांना शुक्रवारी रात्री गावातून हात बांधून नेले होते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवल्यानंतर काल रात्री त्यापैकी तिघांना सोडण्यात आले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत असून सर्व गावकरी पोलीस ठाण्यात आश्रयाला आले आहेत.