- गाेपाल लाजूरकर गडचिराेली - गिधाड पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी गडचिरोली वनविभागातर्फे आठ वर्षांपूर्वी गिधाड उपाहारगृह उभारले हाेते. तेव्हा जिल्ह्यात जवळपास २०० गिधाडांची नाेंद करण्यात आली. त्यानंतर गिधाडांचे उपाहारगृह सुरळीत चालविण्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने गिधाडांची संख्या झपाट्याने घटली. आता गिधाडांचा कुठेही लवलेश दिसून येत नाही. गिधाड संवर्धनासाठी गडचिराेली- धानाेरा मार्गावर लावलेले ‘गिधाड संवर्धन’ संदेश फलक मात्र तेवढे दिसून येत आहेत.
निसर्गातील स्वच्छतादूत म्हणून ओळखले जाणारे गिधाड गडचिराेली जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येत हाेते; परंतु, वर्षभरापासून ते क्वचितच आढळून येतात. यावर्षीच्या उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात गडचिराेली तालुक्याच्या मारकबाेडी भागात ३० च्या संख्येने गिधाड घिरट्या घालताना दिसून आले हाेते. एकट्या गडचिराेली वन विभागात गिधाडांसाठी पाच उपाहारगृहे निर्माण केले हाेते. ही सर्वच उपाहारगृहे आता बंद आहेत.गिधाड खाणार काय?पूर्वी मृत जनावरे कातडी साेलून फेकून दिली जात हाेती. या जनावरांचे मांस खाण्यासाठी गिधाडे येत असत; परंतु, आता पशुधनाची संख्या झपाट्याने घटली. जनावरे म्हातारी झाली की त्यांची कसायाला विक्री केली जातात. आता पशुपालकही पशुधन घरी मरू देत नाहीत. गिधाडांना मृत जनावरे उपलब्ध हाेत नाहीत. त्यामुळे गिधाड काय खाणार, असा प्रश्न आहे. त्यातच वन विभागाने तर गिधाडांचे उपाहारगृहसुद्धा बंद केले.गिधाडांच्या किती प्रजाती?जिल्ह्यात उपाहारगृहांमध्ये चार प्रजातींच्या गिधाडांची नाेंद करण्यात आली हाेती. यामध्ये पांढऱ्या पाठीचे, लांब चोचीचे, हिमालीयन, काळे गिधाड आदींचा समावेश हाेता. यापैकी काळे गिधाड आकाराने सर्वात मोठे असून पहिल्यांदाच गडचिराेली जिल्ह्यातच आढळले हाेते. ही प्रजाती अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून स्थलांतरित हाेते.
उपाहारगृह बंद केल्याने गिधाडांना अन्न मिळेनागडचिरोली तालुक्यातील माडेतुकूम- बाेदली, मुडझा, मारकबाेडी, चामाेर्शी तालुक्यातील मालेरमाल व कुनघाडा रै., सिराेंचा तालुक्यात एक उपाहारगृह निर्माण केले हाेते. वन विभागाने नेमलेले २१ गिधाड मित्र यांच्याकडे उपाहारगृहात मृत जनावरे टाकण्याची जबाबदारी हाेती. हे उपाहारगृह बंद केल्याने गिधाडांना अन्न मिळणे बंद झाले.
गडचिराेली व सिराेंचा वन विभागात गिधाडांचे अस्तित्व हाेते. सध्या या भागातही गिधाड दिसून येत नाहीत. तरीसुद्धा गिधाडांच्या संवर्धनासाठी उपाहारगृह सुरू करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न गडचिराेली वनवृत्तातर्फे केला जाईल.-रमेशकुमार, वनसंरक्षक, वनवृत्त गडचिराेली