गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या ऐन पीएलजीए सप्ताहात पोलिसांनी राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश आले आहे. बुधवारी (6 डिसेंबर) पहाटे झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात 5 महिला तर 2 पुरूष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तूर्तास 5 नक्षलवादी ठार झाल्याची खात्री केली असून अजून नक्षल्यांची शोधमोहीम सुरुच असल्याचे सांगण्यात आले.
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत कल्लेडच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांच्या सी-60 पथकाने भल्या पहाटे तिकडे मोर्चा वळविला. पोलिसांची कुणकूण लागताच नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला, पण पोलीस त्यांच्यावर भारी पडले. नक्षली पूर्णपणे सावरण्यापूर्वीच पोलिसांनी केलेल्या गोळीबाराने नक्षल्यांचा वेध घेतला.यावर्षी मंगळवारपर्यंत (5 डिसेंबर) विविध पोलीस कारवाईत 9 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. पण बुधवारच्या कारवाईत पोलिसांना मिळालेले यावर्षीचे सर्वात मोठे यश आहे. नक्षल सप्ताहामुळे सहायक पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम, डीआयजी अंकुश शिंदे 5-6 दिवसांपासून गडचिरोलीत तळ ठोकून होते. त्यांनी आखलेल्या नक्षलविरोधी मोहिमेमुळे या नक्षल सप्ताहात कोणतीही हिंसक घटना घडविण्यात नक्षलवाद्यांना यश आले नाही हे विशेष बाब आहे.