गडचिराेली : दुर्गम भागातील नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभागातील वांगेतुरी येथे नव्याने पाेलिस स्टेशनची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे पाेलिस स्टेशन केवळ २४ तासांत उभारण्यात आले आहे. पोलिस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोलीपोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव बल १९१ बटालियनचे कमान्डंट सत्यप्रकाश, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, बापूराव दडस व वांगेतुरी पोलिस स्टेशनचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी महेश विधाते हे उपस्थित होते.
पाेलिस स्टेशनच्या उभारणीसाठी १ हजार ५०० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ४ पोकलेन, ४५ ट्रक काम करीत हाेते. पोलिस स्टेशनमध्ये पोलिस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, २० पोर्टा केबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाइल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली.
पोस्ट उभारणी कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना सलवार सुट, नऊवारी साडी, पुरुषांना धोतर, लोअर पॅन्ट, चप्पल, ब्लँकेट, चादर, टी-शर्ट, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकलेट्स, बिस्किट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले की, गडचिरोली पोलिस दल नेहमीच गडचिरोलीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले आहे. त्याचाच परिपाक म्हणून नवीन पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. गडचिरोली पोलिस दल या माध्यमातून गडचिरोलीच्या जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल, असा आशावाद व्यक्त केला.
ग्रामस्थांनी माओवाद्यांच्या खोट्या कथनाने प्रभावित होऊन त्यांच्या भरकटलेल्या क्रांतीला बळी पडू नये. नवीन पोलिस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केले.
जवानांचा राहणार पहारा
- वांगेतुरी पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे ४ अधिकारी व ६३ अंमलदार, एसआरपीएफचे १ अधिकारी व ४२ अंमलदार तसेच सीआरपीएफ १९१ बटालियनचे १ असिस्टंट कमांडन्ट व १ जी कंपनी तसेच १ अधिकाऱ्यासह १ यंग प्लाटुन तैनात करण्यात आली आहे.
- पोलिस स्टेशन स्थापन केल्यानंतर या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी वांगेतुरी, हेडरी, गट्टा जांबिया व संपूर्ण एटापल्ली तालुक्यात पुढच्या १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू केली आहे.