आरमोरी (गडचिरोली) : विविध मागण्यांसाठी आरमोरी येथील सफाई कामगारांनी बुधवारी जुन्या बसस्थानकाजवळील मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी सफाई कामगारांनी नगर परिषदेविरोधात घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. या चक्काजाम आंदोलनामुळे काही वेळ वाहतून ठप्प झाली होती.
नगरपरिषदेच्या कंत्राटदाराने गेल्या तीन महिन्यांपासून कामावरून बंद केलेल्या ७० सफाई कामगारांना तत्काळ कामावर घेण्यात यावे, सफाई कामगारांना किमान वेतनानुसार बँकेतून वेतन अदा करण्यात यावे, कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करून विमा काढण्यात यावा, मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी आदी मागण्यांचा यात समावेश होता.
सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन करून जोपर्यत नगरपरिषद मुख्याधिकारी आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा पवित्रा घेतला. मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी लगेच आंदोलनस्थळी भेट देऊन अन्यायग्रस्त कामगारांशी चर्चा केली. किमान वेतन कायद्यानुसार सफाई कामगारांना वेतन अदा केले जाईल व भविष्य निर्वाह निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र आंदोलनकर्त्याचे समाधान झाले नाही. ते आक्रमक झाल्याने अन्यायग्रस्त सफाई कामगारांच्या प्रतिनिधींना नगरपरिषदेमध्ये बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी सलामे यांनी दिले. यावेळी सफाई कामगारांनी नायब तहसीलदार चापले यांनाही आंदोलनस्थळी मागण्यांचे निवेदन दिले.
कामगारांवर उपासमारीची पाळीया सफाई कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी ९ एप्रिलपासून कामबंद आंदोलन केले होते. परंतु नगरपरिषद मुख्याधिकारी, पदाधिकारी, संबंधित अभियंता व कंत्राटदारांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मागील तीन महिन्यांपासून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. संबंधित कंत्राटदाराने सर्व सफाई कामगारांना वेतन अदा न करता कामावरून काढून टाकले. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व न्याय हक्कासाठी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.